पीएमपीचे गणेश विसर्जनानंतर ‘आगमन’

गेल्या पाच महिन्यांपासून कोरोनामुळे “ब्रेकडाऊन’ असलेल्या पीएमपीचे गणेश विसर्जनानंतर “आगमन’ होणार आहे. शहरात येत्या ३ सप्टेंबरपासून शहरातील १९० पीएमपीची बससेवा सुरू करण्यात येणार आहे.

३ सप्टेंबरपासून २५ टक्‍के क्षमतेने सुरू होणार बससेवा
पुणे : गेल्या पाच महिन्यांपासून कोरोनामुळे “ब्रेकडाऊन’ असलेल्या पीएमपीचे गणेश विसर्जनानंतर “आगमन’ होणार आहे. शहरात येत्या ३ सप्टेंबरपासून शहरातील १९० पीएमपीची बससेवा सुरू करण्यात येणार आहे. दोन्ही शहरातील कंटेन्मेंट झोन लक्षात घेऊन ही सेवा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली.
पीएमपीकडून गणेशचतुर्थीचा मुहूर्त निश्‍चित करण्यात आला होता. मात्र, या दहा दिवसांत पीएमपी सुरू झाल्यास शहरात तसेच पीएमपीमध्ये गर्दी झाल्यास करोनाचे रुग्ण वाढण्याची शक्‍यता लक्षात घेऊन खबरदारीचा उपाय म्हणून हा निर्णय घेण्यात आला असल्याचे मोहोळ यांनी स्पष्ट केले.
२५ मार्च रोजी जाहीर करण्यात आलेल्या लॉकडाऊन नंतर तब्बल दहा लाख दैनंदिन प्रवासी असलेली पीएमपीची बस सेवाही बंद करण्यात आली होती. त्यानंतर टप्प्याटप्प्याने ही सेवा केवळ अत्यावश्‍यक सेवांच्या कर्मचाऱ्यांसाठी सुरू ठेवण्यात आली तर नंतर अनलॉक 1 पासून रेल्वे सेवा तसेच विमान सेवा सुरू झाल्यानंतर, रेल्वे स्थानक तसेच विमानतळावरून ही सेवा सुरू करण्यात आली होती. मात्र, सर्वसामान्य प्रवाशांसाठी ही सेवा बंदच होती. दरम्यान, शहारात २४ जुलैपासून दुसरे लॉकडाऊन संपल्यानंतर शहरातील शाळा, मंदीरे, हॉटेल तसेच जिम आणि सार्वजनिक कार्यक्रम वगळता इतर सर्व सेवा तसेच अस्थापना सुरू झाल्याने शहरातील पीएमपीची सेवा पुन्हा सुरू करण्याची मागणी केली जात होती.
त्यानुसार, मागील आठवड्यात शुक्रवारी पीएमपीच्या अधिकाऱ्यांकडून राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेत, सुरक्षा नियमांचे पालन करून ही सेवा सुरू करण्यासाठी चर्चा केली होती. त्यावेळी उपमुख्यमंत्री पवार यांनी दोन्ही महापालिका आयुक्तांशी पीएमपीने चर्चा करून निर्णय घेऊन बस सेवा सुरू करावी अशा सूचना केल्या होत्या. त्यानंतर आज महापालिकेत महापौरांच्या अध्यक्षतेखाली पीएमपीचा निर्णय घेण्यासाठी बैठक पार पडली.
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या महापौर माई ढोरे, आयुक्त श्रावण हार्डीकर, पुणे महापालिका आयुक्त विक्रम कुमार, स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने, पिंपरीचे स्थायी समिती अध्यक्ष संतोष लोंढे, पीएमपीचे अध्यश शंकर पवार, महापालिकेचे सभागृह नेते धीरज घाटे यांच्यासह महापालिकेचे पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी गणेशोत्सवास बस सेवा सुरू झाल्यास शहरात गर्दी होण्याची भीती व्यक्त करण्यात आली. त्यामुळे गणेशोत्सव संपल्यानंतर 3 सप्टेंबरपासून पीएमपीची सेवा पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
सुरक्षा उपायांची कडक अंमलबजावणी….
दरम्यान, ही सेवा सुरू करताना, सुरक्षा नियमांची कडक अंमलबजावणी करण्यात येणार असल्याचे पीएमपीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक राजेंद्र जगताप यांनी स्पष्ट केले. त्यात, सर्वाधिक गर्दी होणाऱ्या स्वारगेट, हडपसर, कात्रज, कोथरूड डेपो, माळवाडी अशा ठिकाणी गर्दीची वेळ लक्षात घेऊन १२० जादा शटल बस सोडण्यात येणार आहेत. तसेच सर्व प्रमुख बस स्थानकांवर प्रवाशांवर उभे राहण्यासाठी वर्तुळाकार पेंट करण्यात येणार असून गाडीत चढताना, हात सॅनिटाईज करणे तसेच मास्क बंधनकारक असणार आहे. तसेच सोशल डिस्टन्स पाळण्यासाठी प्रत्येक सीटवर मार्किंग करण्यात येणार असून प्रत्येक फेरीनंतर बस सॅनिटाईज केली जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.