मावळमध्ये यंदा १०४ टक्के विक्रमी भात लागवड

मावळ तालुक्यात ऑगस्ट महिन्यात झालेल्या चांगल्या मुसळधार पावसामुळे यंदा १०४ टक्के विक्रमी भात लागवड झालेली असल्याची माहिती तालुका कृषी अधिकारी देवेंद्र ढगे यांनी दिली.

१२ हजार ६७२ एकर क्षेत्रावर भात लागवड

तळेगाव दाभाडे : मावळ तालुक्यात ऑगस्ट महिन्यात झालेल्या चांगल्या मुसळधार पावसामुळे यंदा १०४ टक्के विक्रमी भात लागवड झालेली असल्याची माहिती तालुका कृषी अधिकारी देवेंद्र ढगे यांनी दिली. खरीप भात पिकासाठी अग्रेसर असलेल्या मावळ तालुक्यात मात्र या वर्षी विक्रमी अशी १२ हजार ६७२ एकर क्षेत्रावर भात लागवड झाली आहे. दरवर्षीच्या तुलनेत ही यंदा जास्त आहे. या वर्षीचे उद्दिष्ट पूर्ण करून सुमारे १०४ टक्के क्षेत्रावर लागवड पूर्ण झालेली आहे. सध्या तरी यावर्षी मान्सूनच्या पावसाने खरीप भात पिकास अच्छे दिन आलेले आहेत.

यावर्षी मान्सूनच्या पावसाने जून आणि जुलै महिन्यात चांगला ताण दिला होता. जुलै अखेरपर्यंत ७०% भात लागवड झालेल्या होत्या. मात्र तीन ऑगस्ट पासून मावळ तालुक्याच्या सर्व विभागात विस्तृत प्रमाणात मान्सूनचा जोरदार पाऊस पडला. तर काही भागात संततधार पाऊस झाल्याने खरीप भात पिकाच्या लागवडी पूर्ण होऊ शकल्या.

सध्या तीन चार दिवस मान्सूनच्या पावसाने विश्रांती घेतल्यासारखे दिसत असून खरीप पिकाच्या वाढीस ते चांगले वातावरण आहे.असे तालुका कृषी अधिकारी ढगे यांनी सांगितले. या वर्षी खरिप भात पिकाबरोबर सोयाबीन पिकाचे क्षेत्र वाढलेले आहे. पूर्व भागातील तळेगाव, इंदोरी, सोमाटणे, चांडखेड, शिरगाव, गोडुंब्रे आदी परिसरात एकूण १ हजार ५०० एकर क्षेत्रावर सोयाबीन पेरणी झाली आहे. तर भुईमूग,कडधान्य हि पिके यंदा चांगली आहेत.

चांगल्या पावसाने खरीप पिके चांगली आलेली असल्याने शेतकरी समाधानी आहेत. पावसाचा जोर ओसरला असून भात पिकाच्या वाढीच्या शेवटच्या टप्प्यात आणखी पावसाची गरज असल्याने शेतकरी वर्ग मान्सूनच्या परतीच्या पावसाची वाट पाहत आहे. मावळ पूर्वपट्ट्यात मात्र खरिपा पेक्षा रब्बीचे क्षेत्र अधिक असून पावसाने उघडीप दिल्याने शेतकरी वर्ग रब्बी पिकाच्या पूर्व मशागतीच्या कामाला आणि जमवाजमवीला लागला आहे.