सांगली, सातारा, सोलापुरात पावसाने प्रचंड हाल

गेले दोन दिवस कोसळणाऱ्या पावसाने पश्चिम महाराष्ट्रात धुमाकूळ घातलाय. सांगली, सातारा आणि कोल्हापूर जिल्यातील २१ जणांचा वेगवेगळ्या कारणामुळं या पावसात मृत्यू झाल्याची आकडेवारी समोर येतेय.

सांगलीत पुराच्या पाण्यात ९ जण वाहून गेले असून त्यापैकी ६ जणांचे मृतदेह सापडल्याची माहिती मिळतेय. हा आकडा वाढण्याची शक्यता आहे.

उजनी आणि वीर धरणातून सोडलेल्या पाण्यामुळं पंढरपुरात गंभीर स्थिती निर्माण झालीय. चंद्रभागा नदीवर असणारे सर्व पूल पाण्याखाली गेलेत. त्यामुळे सोलापूर, अहमदनगर, विजापूरकडं जाणारी वाहतूक ठप्प झालीय. राज्यात मुसळधार पावसाचा इशारा दिला असतानाही उजनी धरणातून गेले काही दिवस नियमित विसर्ग करण्यात आला नव्हता. पाऊस झाल्यानंतर मात्र एकदम पाणी सोडणे धरण प्रशासनाला भाग पडले. दरदिवशी होणाऱ्या १० हजार क्युसेक्सऐवजी थेट २.५ लाख क्युसेक्स पाणी सोडण्यात आले. त्यामुळं पंढरपूरसह अनेक गावांवर पुराचं संकट ओढवल्याची माहिती आहे.

सोलापूर जिल्ह्यात अनेक कुटुंबांचं स्थलांतर करण्यात आलंय. अजूनही नदीकाठच्या गावांत लोक अडकले असून त्यांच्या सुटकेसाठी प्रशासन मदत करत असल्याची माहिती मिळतेय.

सातारा जिल्ह्यातली अनेक गावात पूरस्थिती निर्माण झाली होती. विशेषतः पर्यटनस्थळ पाचगणीमध्ये अतिवृष्टी झाल्यामुळं पूर्ण गाव जलमय झालं होतं. माण तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे कांदा, बाजरी आणि घेवडा या पिकांचं मोठं नुकसान झालं.