रिपब्लिकन पक्षाच्या शहराध्यक्षपदी संजय सोनवणे

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या (ए) (Republican party of India) शहर अध्यक्षपदी सर्वानुमते संजय सोनवणे यांची, तर पक्षाच्या शहर पर्यावरण विभागाध्यक्षपदी (City Environment Department) नीलेश रोकडे यांची निवड करण्यात आली आहे.

पुणे : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या (ए) (Republican party of India) शहर अध्यक्षपदी सर्वानुमते संजय सोनवणे यांची, तर पक्षाच्या शहर पर्यावरण विभागाध्यक्षपदी (City Environment Department) नीलेश रोकडे यांची निवड करण्यात आली आहे. संजय सोनवणे यांच्या अध्यक्षपदाचा कालावधी एक वर्षासाठी असून, ऑगस्ट २०२१ मध्ये शैलेंद्र चव्हाण शहर अध्यक्ष सांभाळणार आहेत.

केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री आणि रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांच्या मार्गदर्शनानुसार या निवडी करण्यात आल्या आहेत. आरपीआय शहर कार्यालयात झालेल्या बैठकीत या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी प्रदेश सचिव बाळासाहेब जानराव, पश्चिम महाराष्ट्र आघाडीचे अध्यक्ष परशुराम वाडेकर, माजी उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे, मावळते शहर अध्यक्ष अशोक शिरोळे, संपर्कप्रमुख अशोक कांबळे, ऍड. मंदार जोशी, नगरसेविका हिमाली कांबळे, युवक अध्यक्ष शैलेंद्र चव्हाण, कार्याध्यक्ष बसवराज गायकवाड, सचिव महिपाल वाघमारे, बाबुराव घाडगे, भगवानराव गायकवाड उपस्थित होते.

कोरोना संकटात पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांनी उल्लेखनीय काम केले आहे. कोरोनामुळे अनेकांचे रोजगार गेले आहेत. पोटापाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. अशा अडचणीत सापडलेल्या लोकांना रोजगार, अर्थसहाय्य मिळवून देण्यासाठी पक्षाचा प्रयत्न राहणार आहे. आगामी काळातील पुणे महानगर पालिकेची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून पक्षबांधणीवर भर द्यायचा आहे. त्यासाठी प्रत्येकाने आपल्या पदाला साजेसे असे काम करावे. सर्व आघाड्यांच्या बैठका नियमित व्हाव्यात आदी ठराव या बैठकीत पारित करण्यात आले.