धामारीत विहिरीत पडलेल्या अतिविषारी सापाला जीवदान

शिक्रापूर: धामारी (ता. शिरूर) येथील एका विहिरीमध्ये पडलेल्या अतिविषारी घोणस जातीच्या सापाला विहिरीतून बाहेर काढून सापाला निसर्गाच्या सानिध्यात सोडण्यात सर्पमित्रांना यश आले आहे.

शिक्रापूर: धामारी (ता. शिरूर) येथील एका विहिरीमध्ये पडलेल्या अतिविषारी घोणस जातीच्या सापाला विहिरीतून बाहेर काढून सापाला निसर्गाच्या सानिध्यात सोडण्यात सर्पमित्रांना यश आले आहे. धामारी (ता. शिरूर) येथील माजी सरपंच कैलास डफळ हे सकाळच्या सुमारास विहिरीवरील मोटार चालू करण्यासाठी गेले असताना त्यांना विहिरीमध्ये भला मोठा साप पाण्यामध्ये फिरत असल्याचे दिसून आले. त्यांनतर महाराष्ट्र वन्य पशु पक्षी सामाजिक संस्थेचे सर्पमित्र शेरखान शेख यांना याबाबत माहिती देण्यात आली, त्यावेळी सर्पमित्र शेरखान शेख, गणेश टिळेकर, श्रीकांत भाडळे यांनी त्या ठिकाणी धाव घेत पाहणी केली असता विहिरीमध्ये अतिविषारी जातीचा घोणस साप पडला असल्याचे दिसून आले. त्यांनतर सर्पमित्रांनी माजी सरपंच कैलास डफळ, तुकाराम शेळके, विशाल चौधरी, दत्तात्रय केंजळे, सचिन डफळ, ओमकार क्षीरसागर यांच्या मदतीने दोरीच्या सहाय्याने पाण्यामध्ये पडलेल्या सापाला बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरु केले. तब्बल अर्ध्या तासाच्या प्रयत्नानंतर विहिरीमध्ये पडलेल्या घोणस सापाला पाण्यातून बाहेर काढण्यात यश आले. यावेळी बोलताना कोठेही साप आढळून आल्यास नागरिकांनी घाबरून न जाता सर्पमित्रांना कळविण्याचे आवाहन महाराष्ट्र वन्य पशु पक्षी सामाजिक संस्थेचे सर्पमित्र शेरखान शेख यांनी केले असून जीवदान विहिरीतून बाहेर काढलेल्या सापाला निसर्गाच्या सानिध्यात सोडून देण्यात आले आहे.