हडपसर येथे एटीएममध्ये चोरीसाठी गेलेल्या तळीरामास अटक

चोरीच्या हेतूने एटीएममध्ये घुसलेल्या तळीरामाला हडपसर पोलिसांनी अटक केली आहे. हडपसर येथील मांजरीतील घुले शाळेजवळील एका खाजगी बँकेच्या एटीएममध्ये शनिवारी पहाटेच्या सुमारास हा प्रकार घडला.

पुणे: चोरीच्या हेतूने एटीएममध्ये घुसलेल्या तळीरामाला हडपसर पोलिसांनी अटक केली आहे. हडपसर येथील मांजरीतील घुले शाळेजवळील एका खाजगी बँकेच्या एटीएममध्ये शनिवारी पहाटेच्या सुमारास हा प्रकार घडला. दारूच्या नशेत असलेल्या तरुणाने एटीएमच्या सीसीटीव्ही कॅमेराला चिखल लाऊन मशीनचा दरवाजा तोडून चोरी करण्याचा प्रयत्न केला होता. परंतु एटीएम सीसीटीव्ही कंट्रोल रूम मधील कर्मचाऱ्यांच्या सावधानीमुळे हा प्रकार उघडकीस आला. 

राहुल माणिक तुपेरे (वय ३०, रा. कुंजीरवस्ती, मांजरी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. या प्रकरणी पोलिस शिपाई आकाश गायकवाड यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार हडपसर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हेगाराच्या चौकशी दरम्यान आरोपी हा वाळू विक्रीचा धंदा करतो, अशी माहिती पुढे आली. पैशासाठी दारुच्या नशेत हे कृत्य केले असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.