उर्से गावची एक गाव एक गणपती संकल्पना आजही कायम

गणेशोत्सव म्हटलं की, जिथं नजर जाईल तिथं बाप्पांचं दर्शन घडतं. मग गावागावांत असो पाड्यापाड्यांत असो किंवा गल्लोगल्ली असो. जिथं- तिथं घरोघरी आणि सार्वजनिक मंडळांचे गणपती दिसून येतात.

पालघर : गणेशोत्सव म्हटलं की, जिथं नजर जाईल तिथं बाप्पांचं दर्शन घडतं. मग गावागावांत असो पाड्यापाड्यांत असो किंवा गल्लोगल्ली असो. जिथं- तिथं घरोघरी आणि सार्वजनिक मंडळांचे गणपती दिसून येतात. त्यात आता कोरोनाचं सावट. तरी या कोरोना च्या सावटाखाली पालघर जिल्ह्यात घरोघरी दीड , अडीच आणि पाच दिवसांचा तर सार्वजनिक गणेश मंडळामध्ये पाच , सात आणि अकरा दिवसांसाठी बाप्पांची स्थापना झाली. मात्र एक गाव एक गणपती सारखी संकल्पना क्वचितचं ठिकाणी दिसून येते. आणि अशीच एक गाव एक गणपती ची संकल्पना पालघर जिल्ह्यातल्या एका गावानं गेल्या ४७ वर्षांपासून अविरतपणे सुरू ठेवली आहे.

जिल्ह्यातल्या डहाणू तालुक्यात डोंगराच्या कुशीत आणि सूर्या नदीच्या तिरावर वसलेलं आणि निसर्गरम्य उर्सें हे गाव. जवळपास २५०० इतक्या लोकसंख्येची वस्ती असलेलं हे गाव. याच उर्से गावानं एक गांव एक गणपती च्या माध्यमातून लोकांसमोर एक आदर्श उभा केला आहे. यंदाचं गणेशोत्सवाचं हे ४७ वं वर्ष आहे. गेल्या ४७ वर्षांपासून या उर्से गावात एक गाव एक गणपती ही आदर्श संकल्पना अखंडपणे राबवली जात आहे. केवळ गणेशोत्सव चं नव्हे तर या गावात सर्वच सण याच पद्धतीनं एकत्र येऊन साजरे केले जातात.

या गावात कोणाच्या ही घरी घरघुती गणपती बसवले जात नाहीत. त्यामुळे संपूर्ण गाव एकाच ठिकाणी एकत्र येऊन हा उत्सव मोठ्या आनंदानं साजरा करतात. दरवर्षी गणेशोत्सव आणि गौरी- गणपती उत्सवात इथं विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचं, खेळांचं आयोजन केलं जातं. विशेष म्हणजे गावातले तरुण एकत्र येवून डेकोरेशन आणि आरास तयार करत असतात. इथं बनवण्यात येणारा आरास ही इको फ्रेंडली असतो. यंदा बांबू,नारळाच्या पात्या, लाकडाचा भुसा,कापूस आदी साहित्यांपासून नारळ तयार करून त्यात बाप्पांना विराजमान केलं गेलं आहे. तर यंदा गणेशोत्सवासाठी बाप्पांची मूर्ती कोण आणणार यासाठी लॉटरी पद्धत वापरली जाते. त्यात गावकरी स्वखुशीनं आपापली नावं देतात. आणि त्या नावाच्या चिठ्ठ्यांमधून एक चिठ्ठी उचलली जाते. त्यात ज्याचं नावं येईल त्यांना गणपतीची मूर्ती आणण्याचा आणि पूजेला बसण्याचा मान मिळतो.

उर्से गावाची आणखी एक आगळी-वेगळी परंपरा अशी कि, गणपती आणि गौरी विसर्जनानंतर शिल्लक राहिलेल्या सर्व वस्तूंचा लिलाव केला जातो. भगवंतावरचा भाव म्हणून गावकरी सर्व वस्तू चढ्या भावानं खरेदी करतात. यातून उरलेले पैसे गरजू शेतकऱ्यांना व्याजानं वाटप केले जातात. आणि मग पुढीच्या वर्षी याच पैश्यातून हे सण गावकरी साजरे करतात .

उत्सवासाठी गावाच्या बाहेरून कोणत्याही प्रकारची देणगी स्वीकारली जात नाही. या गावानं स्वतःचं एक भव्य सभागृह कोणती ही देणगी न घेता तयार केलं आहे. तिथचं हे सर्व उत्सव साजरे केले जातात. तर या माध्यमातून उर्से गावानं जनतेला एकतेचा सामाजिक संदेश देण्याचा एक प्रयत्न केलाय.