खडवासला धरणातून विसर्ग सुरू

खडकवासला धरणातून आज दुपारी २ वाजल्यापासून ५ हजार १३६ क्युसेकने विसर्ग सुरु केला आहे, अशी माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली.

पुणे : खडकवासला धरणातून आज दुपारी २ वाजल्यापासून ५ हजार १३६ क्युसेकने विसर्ग सुरु केला आहे, अशी माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली. खडकवासला धरण साखळीतील पानशेत आणि खडकवासला ही दोन्ही धरणे पूर्ण क्षमतेने भरली आहेत. तसेच वरसगाव धरण वरसगाव १२.५६ टीएमसी ( ९८%) टक्के भरले आहे. तर, टेमघर धरणातही ३.०४ टीएमसी (८२.११%) टक्के पाणीसाठा झाला आहे. पानशेत धरणात १०.६५ टीएमसी (१००%), खडकवासला धरणात १.९७ टीएमसी (१००%) इतका पाणीसाठा झाला आहे. म्हणजेच पुणे शहराला पाणीपुरवठा करणारी चारही धरणे १०० टक्के भरण्याच्या स्थितीत आहेत.
काल पावसाचा जोर असल्यामुळे खडकवासला धरणातून नदीपात्रातील विसर्ग बंद करण्यात आला होता. परंतु, धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पुन्हा पाऊस सुरू झाला. त्यामुळे खडकवासला धरणातून आज दुपारी दोन वाजल्यापासून विसर्ग वाढवण्यात आल्याची माहिती खडकवासला पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता विजय पाटील यांनी दिली. नीरा देवघर धरणही जवळपास पूर्ण भरले असून, नीरा नदीत ७५० क्‍युसेकने विसर्ग सोडण्यात येत आहे. त्यामुळे नदीपात्राच्या परिसरातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.