राज्य सरकारच्या मदतीवरुन सत्ताधारी विरोधक भिडले

राज्य सरकार कोरोनाच्या संकटकाळात महापालिकेला काहीच मदत करीत नाही, उशीर करत आहे असे आरोप भाजपच्या नगरसेवकांनी सर्व साधरण सभेत करताच विरोधी पक्षांचे नगरसेवक आक्रमक झाले. कोणी काय केले याची चर्चा होऊ द्या असे आव्हान त्यांनी दिले.

मनसेच्या नगरसेवकांनी ओतली महापौरांसमोर औषधे

पुणे : राज्य सरकार कोरोनाच्या संकटकाळात महापालिकेला काहीच मदत करीत नाही, उशीर करत आहे असे आरोप भाजपच्या नगरसेवकांनी सर्व साधरण सभेत करताच विरोधी पक्षांचे नगरसेवक आक्रमक झाले. कोणी काय केले याची चर्चा होऊ द्या असे आव्हान त्यांनी दिले. तर मनसेच्या नगरसेवकांनी महापौरांसमोर औषधे ओतून रुग्णांची लुट करणाऱ्यांवर कारवाई ची मागणी केली. महापौर मुरलीधर मोहोळ यांनी याप्रकरणी चौकशी चे आदेश प्रशासनाला दिले.

खासगी रुग्णालये आणि या रुग्णालयातील मेडिकल दुकानांकडून रूग्णांची लूट सुरू आहे. याविषयी प्रशासन संबंधितांना नुसत्याच नोटिसा बजावीत आहे. प्रत्यक्षात कोणतीही कारवाई केली जात नसल्याचा आरोप मनसेचे नगरसेवक वसंत मोरे आणि साईनाथ बाबर यांनी केला. रुग्णालयाच्या आवारातील मेडिकल्सवर कारवाई करावी असे फलक हाती धरले होते.महापौरांच्या आसनासमोर उभे राहून खासगी रुग्णालयांमधील मेडिकल्सवर कारवाईची मागणी केली. अनेक दिवस कारवाईची मागणी करीत असतानाही प्रशासन कारवाई करीत नाही. सर्व खासगी रुग्णालयांच्या विरोधात तक्रारी व पुरावे आहेत. रुग्णांच्या नातरवाईकांना वाढीव औषधे खरेदी करायला लावली जात आहेत. नागरिकांकडून हजारो रुपयांची बिले वसूल केली जात असल्याचे मोरे म्हणाले.

हाच धागा पकडत काँग्रेसचे नगरसेवक अरविंद शिंदे यांनी मागील तीन मुख्य सभांमध्ये हा विषय मांडूनही त्याविषयी गांभीर्याने कारवाई केली जात नसल्याचे निदर्शनास आणून दिले. रुग्णालयात ४० हजारांच्या इंजेक्शनची मागणी केली जात आहे. कोविडची औषधे काळ्या बाजारात विकली जात आहेत. या विषयावर चर्चा घडविण्याची मागणी त्यांनी केली. शहरातील परिस्थिती नियंत्रणात नाही. पुणेकरांना त्रास होत आहे. कम्युनिटी स्प्रेड झालाय हे प्रशासन का मान्य करीत नाही असा प्रश्न उपस्थित करीत जम्बो कोविड सेंटर तीन महिन्यांपूर्वीच का उभारले नाही यावरून सत्ताधाऱ्यांना धारेवर धरण्याचा प्रयत्न केला.

त्यावर आक्रमक झालेल्या सभागृह नेते धीरज घाटे यांनी आम्ही नाही राज्य सरकारने उशीर केला आहे. पालिका आपले काम करीत आहे असे उत्तर दिले. महापालिकेने कोरोना आटोक्यात आणण्यासाठी ३००कोटी रुपये खर्च केले तर राज्य शासनाने केवळ ३कोटी रुपये मदत केल्याचे घाटे यांनी नमूद करताच ,विरोधी पक्षाच्या नगरसेवकांनी आक्रमक पवित्रा घेतला. राष्ट्रवादी, काँग्रेस, शिवसेना आणि मनसेच्या नगरसेवकांनी सत्ताधारी भाजपाला धारेवर धरत स्वतःचे अपयश राज्य शासनावर खपवू नका असे सुनावले. राष्ट्रवादीच्या गटनेत्या दीपाली धुमाळ, काँग्रेसचे गटनेते आबा बागुल, शिवसेनेचे गटनेते पृथ्वीराज सुतार, नगरसेवक सुभाष जगताप, प्रशांत जगताप, विशाल तांबे, अरविंद शिंदे आदी नगरसेवक आक्रमक होत महापौरांच्या आसनासमोर जमा झाले. ‘चार महिने तुम्ही काय केले, ३०० कोटी कशावर खर्च केले हे सांगा असा सवाल विरोधी पक्षांनी केला. एकंदरीतच या विषयावर मुख्यसभेत गदारोळ झाला.

महापौर मुरलीधर मोहोळ यांनी राज्य शासन आणि पालिका या विषयावर बोलू नये तसेच केवळ पुणे आणि कोरोना या विषयावर बोलूया, वसंत मोरे यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यावर बोलूया, तीन सभांमध्ये हा विषय सुरू आहे. सर्वांची भावना सारखीच असल्याचे सांगत प्रशासनाला चौकशीचे आदेश दिले. खासगी रुग्णालये आणि तेथील मेडिकल्सकडून देण्यात येणाऱ्या बिलांचे पूर्व लेखापरीक्षण करण्याच्या सूचना प्रशासनाला केल्या. या प्रकरणांची चौकशी करून कारवाई करण्याचे आदेश महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिले. तक्रारींमधील सत्य पडताळण्यासोबतच राज्य शासनाच्या निर्देशांचे पालन होते की नाही हे तपासण्याचे सक्त आदेश मोहोळ यांनी प्रशासला दिले.