महापालिकेच्या कोविड योद्धयांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत मिळण्याचा मार्ग मोकळा

सेवा बजाविताना कोरोनामुळे मरण पावलेल्या महापालिकेच्या २५ कर्मचार्‍यांच्या कुटुंबियांना महापालिकेच्यावतीने तातडीने आर्थिक मदत देण्यासाठी सर्वच राजकिय पक्षांचे एकमत झाले आहे.

सर्व पक्षीय गटनेत्यांनी दिले महापालिका आयुक्तांना पत्र

पुणे : सेवा बजाविताना कोरोनामुळे मरण पावलेल्या महापालिकेच्या २५ कर्मचार्‍यांच्या कुटुंबियांना महापालिकेच्यावतीने तातडीने आर्थिक मदत देण्यासाठी सर्वच राजकिय पक्षांचे एकमत झाले आहे. सर्वसाधारण सभा होत नसल्याने मंजुरी अभावी प्रलंबीत असलेला यासंदर्भातील प्रस्तावाला पहिल्याच सर्वसाधारण सभेत मान्यता देण्यात येईल, या भरवशावर प्रशासनाने तातडीने आर्थिक मदत देण्याची प्रक्रिया सुरू करावी, असे सर्व पक्षीय गटनेत्यांचे पत्र महापालिका आयुक्तांना दिले आहे, अशी माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली.

कोरोनाच्या काळात ड्युटीवर असताना संसर्ग होउन पालिकेचे २५ कर्मचारी आतापर्यंत मरण पावले आहेत. कोरोनाची साथ सुरूवात होतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ड्युटीवर असताना कोरोनामुळे मरण पावलेल्या कोवीड योद्धयांच्या कुटुंबियांना ५० लाख रुपये आर्थिक मदत देण्यात येईल असे जाहीर केले होते, तसे विमाही उतरवला आहे. तर महापौर मुरलीधर मोहोळ यांनीही महापालिकेच्यावतीने कामगार कल्याण निधीतून मृतांच्या कुटुंबियांना ५० लाख रुपये आर्थिक मदत किंवा २५ लाख रुपये आणि एका वारसाला अनुकंपा तत्वावर नोकरी देण्याचे जाहीर केले आहे.

दरम्यान, मागील पाच महिन्यांत पालिकेचे ४०० हून अधिक कर्मचारी, अधिकारी कोरोना बाधित झाले आहेत. दुर्देवाने २५ जणांचा मृत्यूही झाला आहे. महापालिकेच्यावतीने केंद्र शासनाच्या विमा योजनेतील भरपाईसाठी प्रस्तावही पाठविले आहेत. परंतू हे सर्व प्रस्ताव विमा कंपनीने ङ्गेटाळले आहेत. तर महापालिकेच्यावतीने देण्यात येणार्‍या रकमेसाठी वर्गीकरण करावे लागणार असून यासंदर्भातील प्रस्ताव सर्वसाधारण सभेच्या जुलै महिन्याच्या कार्यपत्रिकेवर आहे. राज्य शासनाच्या आदेशामुळे सर्वसाधारण सभा होत नसल्याने या प्रस्तावाला मंजुरीच मिळालेली नाही. दुसरीकडे मृतांच्या नातेवाईक आणि कामगार संघटनांनी मदत मिळत नसल्याने आंदोलनही केले आहे.

या पार्श्‍वभूमीवर सर्वसाधारण सभेत असलेल्या प्रस्तावाला सर्व पक्षांची मान्यता असेल या भरवशावर प्रशासनाने वर्गीकरण करून मृत कर्मचार्‍यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत आणि अनुकंपा तत्वावरील नोकरीची प्रक्रिया सुरू करावी. सभेचे कामकाज सुरू होताच या प्रस्तावाला मान्यता देण्यात येईल, असे  सर्व पक्षीय गटनेत्यांच्या स्वाक्षरीचे पत्र महापालिका आयुक्तांना देण्यात आल्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी नमूद केले.