
'मला कुठल्याही पदाची अपेक्षा नाही पण फक्त गावाच्या...'; बाबाराजे देशमुख यांचे विधान
सोलापूर : पूर्वीपासून मोहिते-पाटील कट्टर समर्थक म्हणून मानले जाणारे सोलापूर जिल्ह्याचे माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष बाबाराजे देशमुख हे मोहिते-पाटील जातील, तिकडे त्यांच्यासोबत असायचे. परंतु, गेल्या वर्षभरापासून ते भाजपच्या वाटेवर असल्याचे दबक्या आवाजात गुप्त चर्चा होत होती. काल पुढील राजकीय दिशा ठरवण्याबाबत विचारविनिमय बैठकीत बाबाराजे देशमुख बोलताना म्हणाले की, गावच्या विकासासाठी मी भाजपमध्ये जाण्याचा निर्णय तुम्हा सर्वांना विचारून घेत आहे. कुठल्याही प्रकारच्या अडचणीसाठी मी भाजपमध्ये जात नसून फक्त आणि फक्त नातेपुते गावचा विकास व गावासाठी भरघोस निधी मिळावा यासाठी भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे.
पुढे ते म्हणाले की, केंद्रात, राज्यात भाजपची सत्ता आहे. गेली 10-12 वर्षात भाजपने विकासाचे काम केले असून, त्या माध्यमातून नातेपुतेसाठी एमआयडीसी आणण्याचा प्रयत्न करू, मला अनेक पक्षाचे निमंत्रण होते. परंतु, मी भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतला. रामभाऊ सातपुते यांचा मुंबईमध्ये वजन आहे. नातेपुतेच्या विकासासाठी रामभाऊ सातपुते व माजी खासदार निंबाळकर यांना पाठबळ देऊन नातेपुते गावचा विकास करून चेहरामोहरा बदलण्याचा प्रयत्न करू. यावेळी रिपाइंचे पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष एन. के. साळवे बोलताना म्हणाले, केंद्रात आणि राज्यात रिपाइं आणि भाजप महायुती असून, इथे सुद्धा गावच्या विकासासाठी आम्ही तुमच्यासोबत असू.
हेदेखील वाचा : Local Body Elections 2025: वडगाव नगरपंचायतीच्या निवडणूक उमेदवारांशिवाय? एकाही उमेदवाराने भरला नाही अर्ज
तसेच अकलूज येथील सुजयसिंह माने-पाटील बोलताना म्हणाले की, बऱ्याच दिवसांपासून बाबाराजे आमच्यासोबत भाजपमध्ये यावेत म्हणून आम्ही प्रयत्न करत होतो. शेवटी आमच्या प्रयत्नांना यश आले. इथून पुढे रामभाऊ सातपुते यांच्यासोबत मिळून विकासाचे काम करू.
*चौकट- बाबाराजे देशमुख यांच्या तिसऱ्यांदा भाजपा प्रवेशाने माळशिरस तालुक्यातील राजकारणात मोठा परिणाम होणार असल्याचे दिसून येत आहे तसेच मोहिते पाटील व आमदार उत्तमराव जानकर गटाला मोठा धक्का बसणार असून भविष्यात नातेपुते येथे मोहिते- पाटील व जानकर गट कोणत्या नेत्याला ताकद देणार हा येणारा काळच ठरवेल*