SIR प्रक्रियेत मतदार आदिवासी महामंडळाच्या निवडणुकीत येणार रंगत; 17 जागांसाठी 43 उमेदवार मैदानात
नाशिक : महाराष्ट्र सहकारी आदिवासी विकास महामंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत उमेदवारांची भाऊगर्दी झाल्यानंतर बिनविरोध निवडणूक करण्याच्या प्रयत्नास प्रतिसाद मिळाला नाही. तर शुक्रवारी अंतिम दिवशी २१ जणांनी माघार घेतली. त्यामुळे १७ जागांसाठी आता ४३ उमेदवार रिंगणात राहिले आहेत. या निवडणुकीत ३ नोव्हेंबरला चिन्ह वाटप होईल, १४ नोव्हेंबरला मतदान होणार असून, १६ नोव्हेंबरला मतमोजणी होईल.
नाशिकमधून मंत्री नरहरी झिरवाळ यांचे पुत्र गोकुळ झिरवाळ, आमदार हिरामण खोसकर यांचे पुत्र वामन खोसकर, माजी आमदार जे. पी. गावित यांचे पुत्र इंद्रजित गावित, माजी आमदार शिवराम झोले रिंगणात आहेत. २०१० नंतर होणाऱ्या निवडणुकीत विक्रमी अर्ज प्राप्त झाले. नऊ गटांसह दोन महिला राखीव अशा १७ जागांसाठीच्या निवडणुकीत ६४ उमेदवारांनी ९९ अर्ज दाखल केले. नाशिक गटातून ९ उमेदवारांनी अर्ज दाखल केले.
सर्वाधिक १० अर्ज महिला गटातून प्राप्त झाले. १७ ऑक्टोबरला अर्ज छाननीनंतर १७ जागांसाठी ६४ उमेदवारांचे ९९ अर्ज शिल्लक होते. शुक्रवारी माघारीचा अंतिम दिवस होता. यात २१ उमेदवारांनी माघार घेतली. यात माजी आमदार निर्मला गावित, जे. पी. गावित, विनायक माळेकर, कमळ माळेकर, भरत गावित यांचा समावेश आहे.
चंद्रपुरात ४ तर गडचिरोलीत ६ उमेदवार मैदानात
पुणे, रायगड, अहिल्यानगर गटातून ८ अर्ज दाखल होते. माजी आमदार वैभव पिचड यांनी समजूत काढत माघारीची फिल्डिंग लावली. त्यामुळे पिचड यांचा एकमेव अर्ज राहिला. अमरावती मतदारसंघातून आमदार केवळराम काळे यांची बिनविरोध निवड झाली. विदर्भात अमरावती, (यवतमाळ- नांदेड), (नागपूर, भंडारा, वर्धा, गोंदिया), चंद्रपूर, गडचिरोली हे मतदारसंघ आहेत. चंद्रपुरात ४ तर गडचिरोलीत ६ उमेदवार मैदानात राहिले आहे.






