एटीएम बसवण्याच्या बहाण्याने १०लाखांची फसवणूक; ७० ते ८० गुंतवणूकदारांना गंडा

आरोपी राजू साळवे तसेच त्याची पत्नी ज्योती आणि गोडसे यांनी फिर्यादी पाटील व अन्य गुंतवणूकदारांना एटीएम बसून देण्याचे सांगून मोबदला म्हणून ज्यादा परताव्याचे आमिष दाखविले. फिर्यादी पाटील यांच्यासह इतर ७० ते ८० गुंतवणूक दारांकडून आरोपींनी १० लाख रुपये अनामत रक्कम घेतली.

    पिंपरी: एटीएम मशीन बसवण्याच्या मोबदल्यात ज्यादा परताव्याचे आमिष दाखवून ७० ते ८० गुंतवणूकदारांकडून १० लाख रुपये घेतले. मात्र, एटीएम मशीन न बसवता गुंतवणूकदारांची फसवणूक केली. याप्रकरणी तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार बावधन येथे घडला.

    अन्नदाता मल्टी सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचा संचालक राजू भीमराव साळवे (वय ४१), त्याची पत्नी ज्योती राजू साळवे (वय ३४, दोघे रा. वारजे – माळवाडी), व्यवस्थापक कुमार श्रीधर गोडसे (रा. बावधन बुद्रूक) यांच्याविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. परमेश्वर दादाराव पाटील (वय ४५, रा. नगर) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार फेब्रुवारी २०२० पासून ते ४ सप्टेंबर २०२१ या कालावधीत घडला.

    आरोपी राजू साळवे हा अन्नदाता मल्टी सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचा संचालक असून, आरोपी गोडसे हा कंपनीचा व्यवस्थापक आहे. आरोपी राजू साळवे तसेच त्याची पत्नी ज्योती आणि गोडसे यांनी फिर्यादी पाटील व अन्य गुंतवणूकदारांना एटीएम बसून देण्याचे सांगून मोबदला म्हणून ज्यादा परताव्याचे आमिष दाखविले. फिर्यादी पाटील यांच्यासह इतर ७० ते ८० गुंतवणूक दारांकडून आरोपींनी १० लाख रुपये अनामत रक्कम घेतली. गुंतवणूकदारांचा विश्वास संपादन करून त्यांच्याकडे ठेवलेल्या अनामत रकमेचा अपहार केला. तसेच एटीएम न बसवता सर्व गुंतवणूकदारांची फसवणूक केली. हिंजवडी पोलीस तपास करत आहेत.