तळेगावच्या हद्दीमध्ये आठ दिवसांमध्ये १०० रुग्ण

नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
तळेगाव दाभाडे:  तळेगाव शहराच्या हद्दीमध्ये अवघ्या आठ दिवसांमध्ये १०० रुग्ण कोरोना संक्रमित सापडल्याने नगरपरिषद प्रशासनाचे धाबे दणाणले आहे. तर एकूण कोरोना संक्रमीत रुग्णाच्या संख्येनं ३०० चा अंक पार केल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.  सध्या तळेगाव मध्ये वाढत चाललेल्या कोरोना पॉझिटिव रुग्णांच्या संख्येमुळे याठिकाणी कोविड १९ सेंटरची आवश्यकता आहे. तसेच नागरिकांनी शासनाने दिलेले नियम पाळण अत्यंत गरजेचं असल्याचं मत प्रशासन व्यक्त करत आहे.

तळेगाव ची लोकसंख्या सुमारे ८० हजार आहे. २४ मार्च ला झालेल्या पहिल्या लॉकडाऊन नंतर तळेगाव मध्ये ७ मेला पहिला कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण मिळाला. त्यानंतर अडीच महिन्यानंतर दिनांक १९ जुलै पर्यंत कोरोना संक्रमित १०० रुग्ण संख्येचा अंक झाला. त्यानंतर अवघ्या १० दिवसांमध्ये (२९ जुलै) कोरोणा संक्रमण रुग्णांचा अंक २०० झाला. त्यानंतर अवघ्या आठ दिवसांमध्ये (दि.६)  रोजी कोरोना संक्रमण रुग्णांच्या अंकाने एकूण ३०० च्या संख्या पार केली.

२४ मार्च पासून कोरणा विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी तळेगावकर नागरिकांनी, अनेक संस्थांनी,नगरपालिका प्रशासनाने शासनाने दिलेल्या नियमाप्रमाणे सर्व बाबींचे पालन केले होते,परंतु शासनाच्या नियमांमध्ये शिथिलता झाल्यानंतर कोरणा रुग्णांचे प्रमाण तळेगाव मध्ये झपाट्याने वाढल्याचे दिसत आहे. सद्यस्थितीमध्ये आठ दिवसाला १०० रुग्ण निदर्शनास येत असून ही बाब अत्यंत चिंतेची असल्याचं मत नागरिक व्यक्त करत आहे.