दहावी पास बोगस डॉक्टरला अटक; वैद्यकीय पदवी नसतानाही वर्षभर रुग्णालयात करत होता नोकरी…

पदवी नसतानाही बिजलीनगर येथील एका रुग्णालयात वर्षभर काम केलेल्या एका बोगस डॉक्टरला पिंपरी पोलिसांनी अटक केली आहे. डॉक्टरचे केवळ दहावीपर्यंत शिक्षण झाले असल्याचे प्राथमिक तपासात पुढे आले आहे.

    पिंपरी : वैद्यकीय पदवी नसतानाही बिजलीनगर येथील एका रुग्णालयात वर्षभर काम केलेल्या एका बोगस डॉक्टरला पिंपरी पोलिसांनी अटक केली आहे. डॉक्टरचे केवळ दहावीपर्यंत शिक्षण झाले असल्याचे प्राथमिक तपासात पुढे आले आहे. अक्षय केशव नेहरकर (रा. बिजलीनगर चिंचवड), असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या बोगस डॉक्टरचे नाव आहे. याबाबत इन्शुरन्स कंपनीचे विशाल भास्कर काटकर (वय 49, रा. वरळी, कोळीवाड) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

    दरम्यान पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अक्षय नेहरकर याच्याकडे कोणतीही वैद्यकीय पदवी नाही. असे असतानाही त्याने वैद्यकीय कन्सल्टंट म्हणून नोकरी मिळवण्यासाठी आयसीआयसीआय जनरल इन्शुरन्स कंपनीस ई-मेलद्वारे रिझ्यूम पाठवला. त्यामध्ये बीएएमएस तसेच एमडी ॲपियर पदवी टाकून सिटी केअर हॉस्पिटल, युनिक हॉस्पिटल, ओएनपी लीला हॉस्पिटल, ऑनेक्स हॉस्पिटल येथे डॉक्टर म्हणून नोकरी केल्याचे नमूद केले. त्याचबरोबर मुलाखती दरम्यान डॉक्टर डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ आयुर्वेदिक रिसर्च सेंटर पिंपरी-चिंचवड येथून पदवी घेतल्याचे सांगितले.

    पदवी प्रमाणपत्राची मागणी केली असता ते न दाखवता त्याने ओनेक्स हॉस्पिटल बिजलीनगर येथे सुमारे एक वर्षापासून डॉक्टर म्हणून नोकरी केली. त्यानंतर नवीन नोकरीच्या शोधात अक्षय नेहरकर याने आयसीआयसीआय लोम्बार्ड जनरल इन्शुरन्स पिंपरी व पुणे विभाग यांच्या कार्यालयीन ईमेल आयडीवर 5 फेब्रुवारीला रिझ्यूम पाठवला. त्याला पिंपरी कार्यालयात मुलाखतीसाठी बोलावले. त्यावेळी तो पदवीची कागदपत्रे सादर करू शकला नाही. तसेच तो डॉक्टर म्हणून नोकरी करीत असलेल्या हॉस्पिटलमधून संबंधित इन्शुरन्स कंपनीकडे मोबदल्यासाठी अनेक प्रकरणे आली. त्यामुळे इन्शुरन्स कंपनीला संशय आला. त्यांनी आरोपीच्या पदवीबाबत संबंधित संस्थेकडे विचारणा केली असता अशी पदवी दिली नसल्याचे 25 मे 2021 रोजी निष्पन्न झाले.