पुणे महानगरपालिकेचा फोटो
पुणे महानगरपालिकेचा फोटो

एक सदस्यीय वाॅर्ड पद्धतीमुळे अनेकांचे धाबे दणाणले. नाराज नगरसेवकांसाठी भाजपला वापरावी लागणार ‘शक्ती’

  पुणे : महापालिका निवडणूक एक सदस्यीय वाॅर्ड पद्धतीने हाेणार असल्याने अनेक जणांचे धाबे दणाणले आहे. सत्ताधारी भाजपचे तेरा नगरसेवक हे राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या संपर्कात आले आहे. यामुळे पुढील काळात सत्ताधारी भाजपला नाराज नगरसेवकांची मनधरणी करण्यासाठी ‘शक्ती’ खर्च करावी लागणार आहे.

  राज्य निवडणुक आयाेगाने राज्यातील अठरा महानगरपािलकांच्या आगामी निवडणुकांसाठी एक सदस्यीय वाॅर्ड रचनेचा कच्चा आराखडा तयार करण्याचे आदेश संंबंधित महापािलका प्रशासनाला दिले आहे. तसेच पुणे महापालिकेच्या हद्दीत नव्याने २३ तर तीन वर्षांपुर्वी अकरा गावे समाविष्ठ केली गेली आहे. यामुळे महापािलकेतील प्रभाग किंवा वाॅर्ड यांची फेररचना हाेणार हे स्पष्ट हाेते. निवडणुक आयाेगाच्या आदेशामुळे यात अधिक स्पष्टता आली आहे.

  एक वाॅर्ड एक नगरसेवक या पद्धतीने निवडणुक झाली तर त्याचा फटका भाजपला बसु शकताे, भाजपचे २० ते २५ नगरसेवकांची निवासस्थाने ही जवळ जवळच आहे. त्यामुळे ते एकाच वाॅर्डमध्ये येऊ शकतात, वाॅर्ड रचनेमुळे त्यांना उमेदवारी मिळविताना पायऱ्या झिजविण्याची वेळ येऊ शकते. संभाव्य स्थिती लक्षात घेऊन भाजपमधील तेरा नगरसेवक हे राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या संपर्कात आले आहे. सत्ताधारी भाजपमधील काही नगरसेवक हे मुळचे राष्ट्रवादी काॅंग्रेस, मनसे, काॅंग्रेसमधील आहेत. त्यांना गेल्या पाच वर्षांत सन्मानाची वागणुक मिळाली नसल्याने नाराज असलेल्यांची संख्या चांगली आहे. त्यातील काही नगरसेवकांचीही घरवापसी हाेऊ शकते.

  दाेन सदस्यीय प्रभाग हाेण्याची आशा

  एक सदस्यीय वाॅर्ड झाला असला तरी आम्हाला अडचण नाही असा दावा सर्वच पक्षांकडून केला जात असला तरी दाेन सदस्यीय प्रभाग हाेण्याची अपेक्षा राष्ट्रवादी काॅंग्रेस आणि भाजपला आहे. यापुर्वी दाेन सदस्यीय प्रभाग पद्धतीने राष्ट्रवादी काॅंग्रेसला चांगले यश मिळाले आहे. २०१७ चा अपवाद वगळता झालेल्या दाेन सदस्यीय प्रभाग पद्धतीत राष्ट्रवादी काॅंग्रेसने काॅंग्रेसला साेबत घेऊन महापालिकेत सत्ता मिळविली.

  २०१७ साली चार सदस्यीय प्रभाग पद्धतीने निवडणुक झाली हाेती. तेव्हा भाजपला चांगले यश मिळाले हाेते. यापुर्वीचा अनुभव लक्षात घेता, राष्ट्रवादी काॅंग्रेसकडून दाेन सदस्यीय प्रभाग पद्धतीसाठी आग्रह धरला जाऊ शकताे. काॅंग्रेस आणि शिवसेनेला एक किंवा दाेन सदस्यीय प्रभाग पद्धतीत सदस्यसंख्या वाढविण्याची संधी मिळू शकते. तर मनसेदेखील घटलेल्या जागा वाढविण्यात यश मिळवू शकते.