टाटा डीटीएल कंपनीकडून खेडला १५ ऑक्सिजन कॉन्सेंट्रेटर

    राजगुरूनगर : टाटा इंटरनॅशनल डीटीएल प्रायव्हेट लिमिटेड यांच्या वाकी (ता. खेड) येथील युनिटकडून खेड महसूल प्रशासनाला १५ ऑक्सिजन कॉन्सेंट्रेटर भेट देण्यात आले. कंपनीच्या सीएसआर फंडातून गुरुवारी (दि. ३) येथील प्रांत कार्यालयात हा लोकार्पण सोहळा पार पडला. यावेळी उपविभागीय अधिकारी विक्रांत चव्हाण, नायब तहसीलदार संतोष चव्हाण, कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजीव बत्रा, मानवसंसाधन विभाग प्रमुख भीमसिंह राजपूत हे उपस्थित होते.

    राजपूत यांनी सांगितले की, कंपनी नेहमीच सामाजिक कार्यात अग्रेसर असते. आरोग्य व शिक्षण या क्षेत्रात कंपनीने भरीव कार्य केले आहे. खेड तालुक्यातील ९५ टक्के शाळांमध्ये शुद्ध पाण्यासाठी आर. ओ. फिल्टर यंत्रे बसविली आहेत. तसेच ग्रामीण भागातील शिक्षकांच्या प्रगतीसाठी आणि बालवाडी ते पाचवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक दर्जात वाढ होण्यासाठी विविध उपक्रम राबविले जातात.

    मागील नोव्हेंबर महिन्यात जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्याकडे २५ ऑक्सिजन कॉन्सेंट्रेटर सुपूर्द केले होते. खेड प्रशासनाला दिलेल्या या ऑक्सिजन कॉन्सेंट्रेटरचा वापर म्हाळुंगे येथील कोविड सेंटरसाठी वापरण्यात येतील, असे प्रांत कार्यालयातील सूत्रांनी सांगितले.