पिंपरी : कोरोना काळात पुणे महानगर परिवहन महामंडळाकडील (पीएमपीएमएल) कर्मचारी महापालिका सेवेत घेण्यात आले होते. आता पीएमपीएमएल बस सेवा सुरु झाल्याने त्या कर्मचाऱ्यांना पुन्हा पीएमपीएमएल सेवेत पाठविण्याचा निर्णय महापालिका आयुक्तांनी घेतला आहे.

    रुग्णसंख्या वाढल्यामुळे महापालिकेला वॉर्डबॉय, कन्टेन्मेंट क्षेत्रात सर्वेक्षण, नावनोंदणी, लसीकरण आदी कामांसाठी मनुष्यबळाची आवश्यकता होती. तर निर्बंधांमुळे पीएमपीएमएल बससेवा बंद होती. त्यामुळे मूळचे महापालिका परिवहन अर्थात पीसीएमटी आणि आत्ताच्या पीएमपीएमएल सेवेतील २५८ कर्मचारी निगडी आगारामार्फत महापालिका सेवेत पाठविले होते. यात हंगामी आणि कायम सेवेतील चालक, वाहकांचा समावेश होता. आता रुग्णसंख्या कमी झाली आहे. निर्बंध शिथिल झाले आहेत.

    पीएमपीएमएल सेवा ५० टक्के क्षमतेने सुरु झाली आहे. त्यामुळे आमचे कर्मचारी आम्हाला परत पाठवा, असे पत्र पीएमपीएमएलच्या निगडी आगार प्रमुखांनी महापालिका आयुक्तांना पाठवले होते. त्यानुसार २५८ पैकी १५० कर्मचाऱ्यांना कार्यमुक्त करुन पुन्हा पीएमपीएमएलकडे परत पाठवावेत, असा आदेश महापालिका आयुक्त राजेश पाटील यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांना दिला आहे.