बारामतीत आयोजित महारक्तदान शिबिरात १६४० बाटल्या रक्तसंकलन

    बारामती / नवराष्ट्र न्यूज नेटवर्क : बारामती शहर पोलिस ठाण्याच्या वतीने बारामतीमध्ये आयोजित करण्यात आलेल्या महा रक्तदान शिबिरात १६४० रक्त बाटल्यांचे संकलन करण्यात आले. या शिबिरात जिल्ह्याचे पोलिस अधिक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी स्वतः रक्तदान केले. त्याचबरोबर बारामती शहर व ग्रामीण पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांसह शहरातील गणेश मंडळांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, युवक युवती आदींनी स्वयंस्फूर्तीने रक्तदान करून या शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

    पोलिस अधिक्षक डॉ. अभिनव देशमुख यांच्या संकल्पनेतून कोरोना महामारीच्या काळात नागरिकांना रक्ताची कमतरता भासु नये, तसेच कोरोनाच्या महामारीच्या काळात पारंपरिक पध्दतीने उत्सव साजरा करून तिसरी लाट येवु नये, त्याचा संसर्ग वाढु नये, या उद्देशाने या शिबिराचे आयोजन केले होते. सामाजिक दृष्टीकोनातुन सार्वजनिक गणेश उत्सव मंडळाचे सहकार्य घेवुन आदर्श गणेश उत्सव सन २०२१ साजरा करण्यासाठी रक्तदान शिबीराचे आयोजन करण्याबाबत पोलिस अधिक्षक देशमुख यांनी सुचित करण्यात आले होते. त्या अनुषगांने अतिरिक्त पोलीस अधीक्षक

    मिलिंद मोहिते, उपविभागीय पोलिस अधिकारी नारायण शिरगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली बारामती ‌ शहर पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक नामदेव शिंदे यांनी पोलिस ठाण्याच्या आवारात भव्य महारक्तदान शिबीर आयोजन केले होते.

    बुधवारी (दि १५) सकाळी १० वा. पोलिस अधिक्षक अभिनव देशमुख यांच्या‌सह अतिरिक्त पोलीस अधीक्षक मोहिते, उपविभागीय पोलिस अधिकारी नारायण शिरगावकर, पोलीस निरीक्षक नामदेव शिंदे यांनी स्वतः प्रथम रक्तदान करून या शिबिराची सुरूवात केली. त्यानंतर प्रभारी अधिकारी नामदेव शिंदे यांच्या आवाहनानुसार बारामती व परिसरातील विविध सामाजिक संघटना, गणेश उत्सव मंडळे,युवा कार्यकर्ते, महिला मंडळ व कॉलेजचे युवा युवती तसेच बारामती शहर पोलीस स्टेशनचे सर्व अधिकारी व अंमलदार यांनी रक्तदान केले.

    सदर रक्तदानात अक्षय ब्लड बँक, पंढरपुर ब्लड बँक, आशा ब्लड बँकेच्या तज्ञ डॉक्टर व नर्ससींग स्टाफच्या मदतीने भव्य महारक्तदान शिबार आयोजित करण्यात आले होते.