जुन्नर तालुक्याच्या चिंतेत भर ; कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या १७ वर

ओतूर : कोरोना संसर्गाने आता शहरी भागातून ग्रामीण भागात पसरण्यास सुरुवात झाली आहे.जुन्नर तालुक्यातील ग्रामीण भागात कोरोनाने शिरकाव केला असून येथे कोरोनाचे १७ रुग्ण सापडले आहेत. यामुळे

 
ओतूर : कोरोना संसर्गाने आता शहरी भागातून ग्रामीण भागात पसरण्यास सुरुवात झाली आहे.जुन्नर तालुक्यातील ग्रामीण भागात कोरोनाने शिरकाव केला असून येथे कोरोनाचे  १७ रुग्ण सापडले आहेत. यामुळे येथील गावकरी  भयभीत झाले आहेत.
 
तालुक्यातील ओतूर,जुन्नर, नारायणगाव,बेल्हा यासारख्या मोठ्या गावांच्या आजूबाजूच्या छोट्या गावातच  कोरोनाग्रस्त रुग्ण आढळून येत असल्याने व सर्व छोट्या गावांतील नागरिकांचा दररोज या मोठ्या बाजारपेठांच्या गावासोबतचा संपर्क असल्यामुळे संपूर्ण तालुका हादरून गेला आहे.आतापर्यंत आढळून आलेल्या पॉझिटिव्ह रुग्णापैकी बहुतांश रुग्ण हे शहरी भागातून गावाकडे आल्याचे स्पष्ट झाली आहे. तालुक्यासाठी ही बाब चिंतेची बनली आहे. शहरी भागातून गावाकडे येण्यासाठी शासनाने काही अटी व नियम केलेले आहेत,मात्र त्या नियमांचे उल्लंघन केले जात असून गावागावातील नागरिक मुक्त संचार करत आहेत. प्रशासनाकडून व प्रसिद्धी माध्यमाद्वारे या मुक्त संचाराच्या धोक्याच्या सूचना वेळोवेळी देऊनही गावी आलेल्या व्यक्तींना गांभीर्य नसल्याची बाब पुढे आली आहे.कोरोनाशी लढा देताना प्रयत्नांची पराकाष्ठा करणाऱ्या व प्रसंगी जीवाची बाजी लावून काम करणाऱ्या लोक प्रतिनिधी,पोलीस प्रशासन,शासन,आरोग्य विभागातील सर्व कर्मचारी,पत्रकार, शिक्षक आदींनी मांडलेल्या सूचनांचे पालन गांभीर्याने केले जात नसल्यामुळे तालुक्यात पॉझिटिव्ह रुग्णांच्या संख्येत झालेली वाढ पुढील प्रमाणे दिसून येत आहे.
 
तालुक्यात यापूर्वी सापडलेला डिंगोरे येथील १ रुग्ण मुंबई येथे उपचार घेत    पूर्ण बरा होऊन आपल्या मुंबईच्या घरी पोहचलेला आहे  तर मागील आठवड्यात धोलवड येथे ३ रुग्ण,सावरगाव येथे ५ ,मांजरवाडी येथे २ ,खिलारवाडी येथे १,पारूंडे येथे २, आंबेगव्हान येथे २,ढालेवाडी तर्फे मिन्हेर येथे नव्याने मिळालेला १ रुग्ण  या प्रमाणे कोरोना पॉझिटिव्हचे एकूण १७  रुग्ण मिळून आले असून हे सर्व  रुग्ण उपचार घेत आहेत अशी माहिती प्रशासनाकडून समोर आली आहे.तर सुरुवातीला कोरोना पाझिटिव्ह निघालेला डिंगोरे येथील एक रुग्ण बरा झालेला आहे.कोरोना रुग्णांच्या संपर्कात आलेल्या सर्व व्यक्तींचे ट्रेसिंग करून हाय रिस्क कॉन्टॅक्ट व लो रिस्क कॉन्टॅक्ट या प्रमाणे वर्गवारी केली जात आहे.
 
हाय रिस्क कॉन्टॅक्ट मधील संशयित रुग्णांना लेण्याद्री येथील भक्त निवास भाग क्रमांक दोन येथे करण्यात आलेल्या कोविड केअर सेंटरमध्ये तपासणीसाठी अडमिट केलेले आहे.सावरगाव येथील हाय रिस्क कॉन्टॅक्ट मधील आठ जणांचे चाचणी अहवाल निगेटिव्ह आलेले आहे. तालुक्यातील धोलवड, जांभूळपट,सावरगाव,मांजरवाडी व खिलारवाडी या ठिकाणी प्रतिबंधित क्षेत्र जाहीर करण्यात आलेले आहे.या प्रतिबंधित क्षेत्रांमध्ये कलम १४४ नुसार लॉकडाऊन करण्यात येऊन दैनंदिन व्यवहार  पूर्णतः बंद करण्यात आलेले आहे तर या क्षेत्रांची नाकाबंदी देखील करण्यात आलेली आहे.एकूण ४४ पथकांमार्फत दररोज सर्वेक्षण करण्यात येत आहे.आतापर्यंत १५१ संशयित रुग्णांची स्वॅब घेण्यात आले असून १६ पॉझिटिव्ह तर १३० निगेटिव्ह अहवाल प्राप्त झालेले आहेत.दहा जणांचे अहवाल प्रलंबित आहेत सर्व नागरिकांनी सोशल डिस्टन्सिंगचे अंतर ठेवून पालन करावे,सार्वजनिक ठिकाणी मास्कचा वापर करावा,साबनाने हात स्वच्छ धुवावेत,होम क्वारंटाईन केलेल्या नागरिकांनी नियमांचे पूर्ण पालन करावे असे आव्हान तालुक्याचे लोकप्रतिनिधी व प्रशासनाकडून करण्यात आलेले आहे.