१७२२ शेतकरी महिलांनी भरले ३ कोटींचे वीजबिल ; महिला दिनी महावितरणकडून सन्मान, अडीच कोटींची माफी

    बारामती : महावितरण बारामती परिमंडलांतर्गत सोलापूर, सातारा व बारामती मंडलातील १७२२ शेतकरी महिलांनी २ कोटी ९८ लाखांचे वीजबिल भरुन तब्बल अडीच कोटींची माफी मिळवली असून, अशा शेतकरी महिलांचा जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने प्रातिनिधीक सत्कार करण्यात आला आहे.

    ‘महा कृषी ऊर्जा अभियानां’तर्गत ‘माझे वीजबिल, माझी जबाबदारी’ मोहीम तीव्र होताना दिसत आहे. वापरलेल्या विजेचे आपण देणे लागतो ही भावना त्यातून दृढ होताना दिसत आहे. बारामती परिमंडांतर्गत सर्व मिळून ६० हजार शेतकऱ्यांनी ९६ कोटी ४० लाखांचे वीजबिल भरले आहे. तर यामध्ये १७२२ शेतकरी महिलांचा समावेश आहे. त्यांनी २ कोटी ९८ लाखांचा भरणा करुन अडीच कोटींची माफी मिळवली आहे. यामध्ये बारामती मंडलातील ७३५, सातारा ७६४ व सोलापूरच्या २२३ महिलांचा समावेश आहे. वीजबिल भरण्यासाठी पुढाकार घेणाऱ्या महिलांचा प्रातिनिधीक सत्कार (प्र.) प्रादेशिक संचालक अंकुश नाळे, मुख्य अभियंता सुनील पावडे यांचेसह सर्व अधीक्षक अभियंता व कार्यकारी यांचेहस्ते करण्यात आला आहे.

    महावितरण बारामती परिमंडल कार्यालयात महिला दिन साजरा

    महिला दिनाच्या निमित्ताने परिमंडल कार्यालयात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मानसोपचार तज्ञ डॉ. अपर्णा पवार, निर्भया पोलीस पथकाच्या अमृता भोईटे यांचेसह मुख्य अभियंता सुनील पावडे, सहा. महाव्यवस्थापक (वित्त व लेखा) सौ. किर्ती भोसले, सहा. महाव्यवस्थापक (मासं) पांडुरंग वेळापुरे ह्यांची प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती हेाती. महावितरणमधील महिला कर्मचाऱ्यांचा प्रातिनिधीक सत्कार यावेळी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी बोलताना मुख्य अभियंता पावडे म्हणाले, महिला नातेसंबंध सांभाळून कार्यालयीन काम पुरुषांच्या बरोबरीने करतात. पण ते स्वत:कडे मात्र दुर्लक्ष करतात. त्यांनी स्वत:साठी किमान एक तास दररोज दिला पाहिजे. डॉ. अपर्णा पवार यांनी महिलांनी शारिरिक व मानसिक आरोग्य जपण्याचा सल्ला दिला. महिला पोलीस कर्मचारी अमृता भोईटे यांनी महिलांना स्वत:च्या पायावर उभे राहण्याचा व सुरक्षित राहण्यासाठी व्यक्त होण्याचा कानमंत्र दिला. तर महिला अभियंता मोना गणवीर यांनी स्त्री-पुरुष समानता विषयावर परखड मत मांडले.सूत्र संचालन महेश जाधव यांनी केले. तर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सहा. महाव्यवस्थापक किर्ती भोसले यांनी परिश्रम घेतले.