पुण्यात एकाच दिवसात २,१२० नवीन कोरोनाबाधित

पुणे : पुण्यात(pune) एकाच दिवसात सर्वाधिक कोरोनाबाधित(corona affected) आढळण्याचा आज उच्चांक झाला. शहरात आज एकाच दिवसात २ हजार १२० नवीन रुग्ण आढळले आहेत. तर १ हजार ८८३ बरे झालेल्या रुग्णांना डिस्चार्जही देण्यात आला आहे. उपचार घेणार्‍या महापालिका हद्दीबाहेरील २२ रुग्णांसह ६५ जण मरण पावले आहेत.

कोरोना संसर्गावर मात करण्यासाठी राज्य शासनाच्या निर्देशानुसार सुरू करण्यात आलेल्या माझे कुटुंब माझी जबाबदारी या योजनेअंतर्गत घरोघरी जाउन संशयित रुग्णांची तपासणी करण्यास सुरूवात झाल्याने रुग्णसंख्या वाढण्याचे संकेत मिळत आहेत. आतापर्यंतची रुग्णसंख्या १ लाख २४ हजार ५६८ झाली असून १ लाख ३ हजार ९७८ रुग्ण बरेही झाले आहेत. मात्र मृत्यूची संख्याही दिवसेंदिवस वाढत असून एकट्या पुणे शहरामध्ये मृत्यूचा आकडा २ हजार ९१८ पर्यंत पोहोचला आहे.

शहरातील विविध रुग्णालये, क्वारंटाईन सेंटर्स तसेच होम क्वारंटाईन असलेल्या ऍक्टीव्ह रुग्णांची संख्या १७ हजार ६७२ इतकी झाली असून बाहेरील साधारण ३० टक्के रुग्णही उपचारासाठी शहरातील शासकिय व खाजगी रुग्णालयात दाखल आहेत. एकट्या पुणे महापालिकेच्या हद्दीतील ३ हजार ४५३ रुग्ण ऑक्सीजनवर असल्याने ऑक्सीजन बेडस् मिळविण्यासाठी रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना अनेक प्रसंगांना तोंड द्यावे लागत आहे. अशातच रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असल्याने बेडसचे नियोजन करणे हे प्रशासनासमोर मोठे आव्हान आहे. ऑक्सीजनवर असलेल्या रुग्णांपैकी ९३६ रुग्ण गंभीर आहेत. त्यापैकी ४८० जणांना व्हेंटीलेटरव ठेवण्यात आले आहे. दरम्यान आज दिवसभरात ७ हजार १६२ रुग्णांची अँटीजेन तसेच स्वाब टेस्ट घेण्यात आली आहे.

पुणे विभागातील २ लाख ५८ हजार १८२ कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या ३ लाख ४३ हजार ९४ झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण संख्या ७५ हजार ९८७ इतकी आहे. कोरोनाबाधीत एकुण ८ हजार ९२५ रुग्णांचा मृत्यू झाला असून मृत्यूचे प्रमाण २.६० टक्के आहे. पुणे विभागामध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण ७५.२५ टक्के आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिली.

पुणे जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण २ लाख ३१ हजार १९६ रुग्णांपैकी १ लाख ८४ हजार ६४९ रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या ४१ हजार ३६६ आहे. कोरोनाबाधित एकूण ५ हजार १८१ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचे प्रमाण २.२४ टक्के इतके आहे तर बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण ७९.८७ टक्के आहे.