भीमा नदीत २१३० क्यूसेक विसर्ग; नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

    राजगुरुनगर : खेड तालुक्यातील चासकमान धरणाच्या पाणलोट क्षेत्रमध्ये होणाऱ्या पावसामुळे धरणाच्या पाणीपातळी वाढत आहे. त्यामुळे नदीत २१३० क्यूसेक्स विसर्ग सुरू झाल्याने नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन चासकमान पाटबंधारे उपविभागाचे सहाय्यक अभियंता प्रेमनाथ शिंदे यांनी केले आहे.

    शनिवारी (दि.११) दुपारी साडेतीन वाजता चासकमान धरणाच्या सांडव्यावरून ९२५ क्यूसेकवरून १८५० क्यूसेक पाण्याचा विसर्ग वाढविण्यात आला असून, भीमा नदीपात्रात सोडण्यात आला आहे. तसेच विद्युत गृहातून ८५० क्यूसेक निसर्ग सुरू असून, त्यापैकी ५७० क्युसेक कालव्यातून चालू आहे व २८० क्युसेक कि. मी. ०/८१० मधील अतिवाहकमधून नदीत सोडण्यात आले आहे.

    भीमा नदीत एकूण २१३० क्यूसेक विसर्ग सोडण्यात आला आहे. तसेच पावसाच्या प्रमाणानुसार विसर्ग पुन्हा कमी/जास्त करण्याची शक्यता आहे. त्यामुळे नदीकाठच्या सर्वांनी काळजी घ्यावी, असे आवाहन शिंदे यांनी केले आहे.