सुशिक्षित वाहनचोरांकडून २४ दुचाकी वाहने जप्त

    पिंपरी : शहराच्या विविध भागांतून वाहनचोरी करणाऱ्या अशा चौघांना भोसरी एमआयडीसी पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून 24 दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे अटकेत असलेले चोरटे शिक्षित असून, त्यापैकी एकजण कॉम्प्युटर इंजिनियर आहे.

    आकाश केरनाथ बधे (२२, रा. फातिमानगर, आदर्शनगर, मोशी) हा कॉम्प्युटर इंजिनियर असून, विलास बाळशिराम मोरे (३५, रा. संतनगर सेक्टर नंबर ४ मोशी प्राधिकरण, मोशी) हा बीए, अक्षय अभिमान जाधव (२१, रा. एमआयडीसी, भोसरी) हा दहावी तर ऋषिकेश शांताराम पिंगळे (२१, रा. नारोडी ता. आंबेगाव, जि. पुणे), अशी अटक आरोपींची नावे आहेत.

    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी पिंपरी-चिंचवड परिसरातील विविध भागांतून वाहनचोरी करत होते. वाहनचोरीचे गुन्हे उघडकीस आणण्यासाठी पोलिस आयुक्त कृष्णप्रकाश यांनी सूचना दिल्या होत्या. त्या संदर्भातील एकूण १७ गुन्हे उघडकीस आणले असून, त्यांच्याकडून १६ लाख किंमतीच्या २४ दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत.