अंगात दैवीशक्ती असल्याचे भासवून उकळले २५ लाख ; शितोळे महाराजांचा प्रताप

शिक्रापूर: शिक्रापूर (ता. शिरूर) पोलीस स्टेशन येथे एका बेपत्ता व्यक्तीचे अपहरण केल्याप्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आलेल्या महाराजाने बेपत्ता व्यक्तीकडून अंगामध्ये दैवीशक्ती असल्याचे भासवून लाखो रुपये

शिक्रापूर: शिक्रापूर (ता. शिरूर) पोलीस स्टेशन येथे एका बेपत्ता व्यक्तीचे अपहरण केल्याप्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आलेल्या महाराजाने बेपत्ता व्यक्तीकडून अंगामध्ये दैवीशक्ती असल्याचे भासवून लाखो रुपये उकळल्याचे समोर आले आहे.या महाराजावरील दाखल गुन्ह्यांमध्ये वाढ करण्यात आल्याची माहिती शिक्रापूर पोलिसांनी दिली आहे. वढू बुद्रुक (ता. शिरूर) येथून गेलेल्या एका व्यक्तीचा महाराज असलेल्या अजित शितोळे व त्यांच्या साथीदाराने अपहरण केल्याच्या संशयातून बेपत्ता इसमाच्या बहिणीने दिलेल्या फिर्यादीवरून शिक्रापूर पोलिसांनी अजित पांडूरंग शितोळे (महाराज) रा. न्हावी सांडस ता. हवेली जि. पुणे, ईश्वर शिवाजी ढगे, रोहिदास राघुजी गायकवाड दोघे रा. आपटी ता. शिरूर जि. पुणे यांच्या विरुद्ध अपहरण व आदी गुन्हे दाखल केले होते, त्यानंतर शिक्रापूर पोलिसांनी तिघांना अटक करून शिरूर न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्यांना पाच दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिलेले असताना, शिक्रापूर पोलिसांनी त्यांच्याकडे चौकशी करत इतरांकडे देखील चौकशी केली असताना महाराज म्हणून घेणाऱ्या अजित शितोळे यांनी बेपत्ता झालेल्या गजानन घारे या व्यक्तीकडून माझ्या अंगामध्ये दैवी शक्ती असल्याचे सांगत घारेकडे अंधश्रद्धा पसरवित तुझे अडकलेले लाखो रुपये काढून देतो असे सांगत तुझे अडकलेले पैसे काढण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारे पूजाअर्चा करावे लागेल असे सांगून तब्बल पंचवीस लाखाहून अधिक पैसे उकळले असल्याचे समोर आले. याबाबत पोलिसांनी शितोळे यांच्याकडे चौकशी केली असता त्याने बेपत्ता घारे याचेकडून लाखो रुपये घेतले असल्याचे देखील कबुल केले आहे. याबाबत शिक्रापूर पोलिसांनी अजित शितोळे (महाराज ) याचेवरील अपहरण व आदी गुन्ह्यांमध्ये वाढ करून त्यामध्ये फसवणूक तसेच अंधश्रद्धा बाबतचे देखील गुन्हे दाखल केले आहे. सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक सदाशिव शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक मयूर वैरागकर व पोलीस हवालदार प्रशांत गायकवाड हे करत आहे.