२५० टन कचऱ्याचा भार पुणे महापालिकेवर ; गावे समाविष्ट झाल्याने कचऱ्याची वाढ

-महापालिका हद्दीत दररोज सरासरी २१०० टन कचऱ्याची निर्मिती

  पुणे : शहराच्या हद्दीलगतची २३ गावे महापालिका हद्दीत आल्यानंतर आता या गावांच्या कचऱ्याची शास्त्रशुद्ध पद्धतीने विल्टेवाट लावण्याची जबाबदारी महापालिकेवर आली आहे. या गावांमध्ये सुमारे २५० टन कचरा निर्माण होत असून, तो जिरविण्यासाठी महापालिकेला पायाभूत सुविधा आणि प्रकल्प उभारावे लागणार आहे. त्यासाठी नियोजन सुरू झाले आहे. पुणे महापालिका हद्दीत दररोज सरासरी २१०० टन कचऱ्याची निर्मिती होत आहे.

  यामध्ये सुमारे १८५० टन कचरा संकलित केला जातो, १२० टन कचऱ्यावर पुनर्प्रक्रिया केले जाते, तर सुमारे १५० टन कचरा निर्मितीच्या ठिकाणीच नष्ट केला जात आहे. घरोघरी जाऊन संकलित केल्या जाणाऱ्या १८५० टन कचऱ्यापैकी ७५० टन ओला तर ८०० टन सुका कचरा आहे. सुमारे २५० टन मिश्र कचरा आहे. ओल्या व सुक्या कचऱ्यावर प्रक्रिया करण्याची १५०० टन इतकी क्षमता आहे. मात्र, शहरातील कचरा प्रकल्प पूर्ण क्षमतेने चालविले जात नसल्याने कचऱ्याचे ढिगारे प्रकल्पांच्या ठिकाणी लागत आहेत. महापालिका प्रशासनाने १४०० टन क्षमतेचे नवे प्रकल्प उभारण्यासाठी नियोजन केले आहे, पण सद्यःस्थितीतील प्रकल्प हे ५० टक्के कमी क्षमतेने सुरू आहेत.

  शहराच्या हद्दीलगतच्या गावांमध्ये कचरा व्यवस्थापन व्यवस्थित झालेले नाही. ग्रामपंचायतींनी व्यवस्था केली असली तरी मोठ्या प्रमाणात झालेली बांधकामे व अपुरी व्यवस्था यामुळे हा कचरा नदीपात्र, नाले, कालवा तसेच मोकळ्या जागा, रस्त्यांच्या कडेने अनेक जण टाकतात. त्यामुळे या भागात अस्वच्छता व दुर्गंधी पसरते. मोकळ्या जागेत कचरा न जिरवता तो थेट जाळला जात असल्याने परिसरातील नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागतो. अशा स्थितीत आता या २३ गावांच्या कचऱ्याची जबाबदारी महापालिकेवर आली आहे. घनकचरा विभागाने याचा आढावा घेतला असून, त्यामध्ये एकूण २५० टन कचरा निर्माण होतो. त्यामध्ये नऱ्हे, कोंढवे-धावडे, वाघोली, मांजरी बुद्रूक या चार गावात सर्वाधिक १३६ टन कचरा निर्माण होतो. त्यामुळे या ठिकाणचे व्यवस्थापन करताना महापालिकेला प्राधान्य द्यावे लागणार आहे. यासाठी महापालिका व जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली जाणार आहे.

  या माहितीचे होतेय संकलन
  * सध्याची कचरा विल्हेवाट लावण्याची पद्धत?
  * ओला व सुक्या कचऱ्याचे प्रमाण?
  * वाहतूक व्यवस्था कशी आहे, वाहने किती?
  * मनुष्यबळ उपलब्धता?
  * गायरान आहे का?