मोफत बेडसाठी लाख रुपये घेणाऱ्या ३ डॉक्टरांची रवानगी पोलीस कोठडीत

२३ एप्रिल रोजी पहाटे सुरेखा अशोक वाबळे (रा.चिखली) यांना ऑटो क्लस्टर येथील कोविड रुग्णालयात दाखल करण्यात आले. महापालिकेच्या या रुग्णालयात दाखल करण्यासाठी कोणत्याही प्रकारचे शुल्क नसताना आरोपी डॉक्टरांनी सुरेखा वाबळे यांच्या नातेवाइकांकडून बेड मिळवून देण्याच्या उद्देशाने पैसे उकळले. एक लाखापैकी ८० हजार रूपये डॉ. प्रवीण जाधवने तर वीस हजार रुपये पद्मजा हॉस्पिटलच्या डॉ. शशांक भरत राळे आणि डॉ. सचिन श्रीरंग कसबे या दोन्ही डॉक्टरांनी घेतले.

    पिंपरी : पिंपरी – चिंचवड महापालिकेच्या ऑटो क्लस्टर रुग्णालयात कोरोनाबाधित रुग्णाला बेड उपलब्ध करुन देण्यासाठी एक लाख रुपये घेणाऱ्या तीन डॉक्टरांना पोलिसांनी गजाआड केले असून न्यायालयाने त्यांची रवानगी ६ मे पर्यंत पोलीस कोठडीत केली आहे.

    फॉर्च्युन  स्पर्श हेल्थ केअर संस्थेचे डॉ. प्रवीण शांतवन जाधव, वाल्हेकरवाडी येथील पद्मजा हॉस्पिटलचे डॉ. शशांक भरत राळे आणि डॉ. सचिन श्रीरंग कसबे अशी अटक करण्यात आलेल्या आरोपी डॉक्टरांची नावे आहेत. या प्रकरणी पिंपरी – चिंचवड महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप (वय ५५, रा. चिंचवड) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

    चिंचवड येथील ऑटो क्लस्टरमध्ये महापालिकेचे कोविड हॉस्पिटल सुरू केले आहे. फॉच्र्युन स्पर्श हेल्थ केअर ही खासगी संस्था त्याचे संचलन करते. या हॉस्पिटलचा सर्व खर्च महापालिका करत आहे. मोफत उपचार होत असलेल्या या हॉस्पिटलमध्ये महापालिका शाळेच्या मुख्याध्यापिकेला आयसीयू बेड देण्यासाठी एक लाख रुपये घेतल्याचा संतापजनक प्रकार नुकताच उघडकीस आला. नगरसेवक कुंदन गायकवाड, विकास डोळस यांनी या प्रकारचा भांडाफोड केला. त्यावर संतप्त झालेल्या नगरसेवकांनी शुक्रवारी (दि.३०) महासभेत आक्रमक पवित्रा घेतला. त्यावर महापौर उषा ढोरे यांनी दोषींवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश आयुक्तांना दिले .त्यानुसार, अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात रितसर तक्रार दिली आहे.तर, महापालिका आयुक्त राजेश पाटील यांनी पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश यांना तक्रारअर्ज दिला आहे.पोलिस आयुक्तांनी या प्रकराची गंभीर दखल घेत तातडीने पावले उचलली.

    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २३ एप्रिल रोजी पहाटे सुरेखा अशोक वाबळे (रा.चिखली) यांना ऑटो क्लस्टर येथील कोविड रुग्णालयात दाखल करण्यात आले. महापालिकेच्या या रुग्णालयात दाखल करण्यासाठी कोणत्याही प्रकारचे शुल्क नसताना आरोपी डॉक्टरांनी सुरेखा वाबळे यांच्या नातेवाइकांकडून बेड मिळवून देण्याच्या उद्देशाने पैसे उकळले. एक लाखापैकी ८० हजार रूपये डॉ. प्रवीण जाधवने तर वीस हजार रुपये पद्मजा हॉस्पिटलच्या डॉ. शशांक भरत राळे आणि डॉ. सचिन श्रीरंग कसबे या दोन्ही डॉक्टरांनी घेतले. उपचारादरम्यान सुरेखा वाबळे यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी आरोपी जाधवला त्वरीत अटक करण्यात आली. मात्र, आरोपी डॉ. राळे आणि कसबे पळून जाण्याच्या तयारीत असताना पोलिसांनी त्यांना अटक केली. तीनही डॉक्टर आरोपींना न्यायालयात हजर केले असता ६ मे पर्यंत पोलीस कोठडीत रवानगी करण्याचे आदेश न्यायालयाने दिले. मृत्यूमुखी पडलेल्या सुरेखा वाबळे यांना रूग्णालयात दाखल करताना त्यांच्या हातामध्ये सोन्याच्या दोन अंगठ्या होत्या. त्याही गायब झाल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. याबाबत पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश म्हणाले, मोफत बेडसाठी आरोपींनी आणखी कोणाच्या नातेवार्इंकांकडून पैसे घेतले आहेत का ? याचा पोलीस तपास करत आहेत. पैसे घेतले असतील तर नागरिकांनी तक्रारींसाठी पुढे यावे, असे आवाहनही त्यांनी केले.