आरटीईच्या राखीव जागांवर अद्याप ३६ टक्के प्रवेश ; प्रवेशासाठी आता ९ जुलैपर्यंतची मुदत

निवड यादीतील विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाल्यावर उर्वरित रिक्त जागांकरिता प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांनी प्राधान्य क्रमानुसार संधी दिली जाणार आहे. प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांच्या प्रवेशाबाबत प्रवेशाच्या पोर्टलवर स्वतंत्र सूचना देणार असल्याचे शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे.

    पुणे : शिक्षण हक्क कायद्यांतर्गत निवड झालेल्यांपैकी केवळ ३६ टक्के विद्यार्थ्यांचे प्रवेश आतापर्यंत निश्चित झाले आहेत. गेल्या काही महिन्यांपासून ही प्रवेश प्रक्रिया लांबणीवर पडल्याने त्याकडे पालकांनी पाठ फिरविली असल्याचे दिसत आहे. लॉटरीद्वारे निवड झालेल्या विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी आता ९ जुलैपर्यंतची मुदत देण्यात आली आहे.

    आरटीईअतंर्गत २०२१-२२ या शैक्षणिक वर्षात प्रवेशाच्या लॉटरीत निवड झालेल्या विद्यार्थ्यांसाठी सध्या प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे या प्रक्रियेला स्थगिती देण्यात आली होती. जूनमध्ये अखेर या प्रक्रियेला गती मिळाली. लॉटरीद्वारे निवड झालेल्या विद्यार्थ्यांसाठी ३० जूनपर्यंत प्रवेशाची मुदत यापूर्वी दिली होती. आता ही मुदत ९ जुलैपर्यंत वाढविण्यात आली आहे. दरम्यान राज्यातील ९६ हजार ६८४ जागांवरील प्रवेशाच्या सोडतीत जवळपास ८२ हजार १२९ विद्यार्थ्यांची निवड झाली होती. आतापर्यंत त्यातील ३८ हजार ८०३ विद्यार्थ्यांनी तात्पुरते प्रवेश घेतले आहेत. तर २९ हजार ६९० विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केले आहेत.