युथ स्किलिंग प्रोग्राममधून पुण्यातील ४३० वंचित तरुणांना रोजगारक्षम प्रशिक्षण मिळणार

-एसओएस चिल्ड्रन्स विलेजेस आणि एचएसबीसी सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटतर्फे उपक्रमाचे आयोजन 

पुणे : एसओएस चिल्ड्रन्स विलेजेस ऑफ इंडियाने एचएसबीसी सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट (इंडिया)च्या सहकार्याने गेले वर्षभर सामाजिक-आर्थिकदृष्ट्या वंचित गटातील ४३० अरक्षित तरुणांना प्रशिक्षण देऊन त्यांना अधिकृत अर्थव्यवस्थेत लाभकारक रोजगार मिळण्यास सक्षम केले आहे.

१८ ते ३० वर्षे या वयोगटातील या तरुणांमध्ये २४४ मुले आणि १५६ मुलींचा समावेश आहे. यातील बहुतांश तरुण पुण्यातील झोपडपट्ट्यांमध्ये राहणारी आहेत आणि त्यांना आर्थिक अडचणींमुळे शाळा आणि कॉलेजचे शिक्षण अर्धवट सोडावे लागले. आता त्यांना सहा महिने ते दोन वर्षांच्या विविध कालावधीच्या अभ्यासक्रमांमध्ये सामावून घेण्यात आले आहे. यात कम्प्युटर अॅप्लिकेशन विथ फायनान्शिअल अकाऊंटिंग, अॅडव्हान्स डिप्लोमा इन एअर टिकीटिंग अॅण्ड ट्रॅव्हल मॅनेजमेंट, सप्लाय चेन मॅनेजमेंट, फायर इंजिनीअरिंग अॅण्ड सेफ्टी मॅनेजमेंट तसेच मेडिकल लॅब टेक्निशिअन आणि मल्टि-पर्पझ हेल्थ वर्कर अशा अभ्यासक्रमांचा समावेश आहे.

एसओएस चिल्ड्रन्स विलेजेसच्या फॅमिली स्ट्रेंथनिंग प्रोग्रामअंतर्गत हा युथ स्किलिंग प्रोग्राम जानेवारी २०१९ मध्ये पुण्यात सुरू करण्यात आला. या उपक्रमात वंचित कुटुंबांना त्यांच्या उत्पन्न क्षमता वाढवण्यात साह्य केले जाते. तरुणांना कौशल्ये शिकवण्यावर आणि त्यांना औपचारिक रोजगाराशी जोडून देण्यात साह्य करणाऱ्या या उपक्रमाला एचएसबीसी सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट (इंडिया)चा पाठिंबा लाभला आहे.

या उपक्रमाबद्दल बोलताना एसओएस चिल्ड्रन्स विलेज ऑफ इंडियाचे सेक्रेटरी जनरल सुदर्शन सुची म्हणाले, “गरिबी आणि असमानता दूर करण्यासाठी कौशल्य विकास हे एक अत्यंत परिणामकारक साधन आहे. वंचित तरुणांमध्ये रोजगार आणि उद्यमशीलतेशी संबंधित कौशल्ये विकसित करण्यावर आमचा भर आहे. जेणेकरून त्यांना सन्मानाने कमावता येईल. आर्थिक अडचणींमुळे औपचारिक शिक्षण अर्धवट सोडलेल्या पुण्यातील वंचित तरुणांना आम्ही यासाठी निवडले आहे. त्यांनी याआधी काय प्रकारचे शिक्षण घेतले आहे याची माहिती घेऊन त्यांच्या महत्त्वाकांक्षा आणि कल यानुसार पुण्यातील विविध प्रशिक्षण संस्थांमध्ये त्यांना प्रशिक्षण कार्यक्रमासाठी आम्ही दाखल केले आहे. या रोजगारक्षम प्रशिक्षणामुळे त्यांची रोजगारक्षमता प्रचंड वाढली आहे. हा प्रशिक्षण अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्या बहुतांश तुरणांना औपचारिक रोजगार बाजारपेठेत आपले स्थान निर्माण करता आले आणि आता ते आपल्या कुटुंबाच्या उत्पन्नात भर घालत आहेत, हे सांगताना मला आनंद वाटतो.”

 

ते पुढे म्हणाले, “भारत हा जगातील सर्वात तरुण देश आहे. सध्या आपली वयाची सरासरी २९ वर्षे आहे. भारतीय तरुणांकडे स्वबळावर उभे राहण्यासाठी आवश्यक कौशल्ये आणि ज्ञान असेल आणि ते समाजातील एक कमावते सदस्य असतील याची खातरजमा करण्यास एसओएस चिल्ड्रन्स विलेजेस बांधिल आहे. वंचित पार्श्वभूमीतील तरुणांना विविध कौशल्ये आणि क्षमतांच्या माध्यमातून रोजगारक्षम बनवण्याच्या आमच्या सर्वसमावेशक दृष्टिकोनातून आम्ही त्यांना व्यावसायिक, तांत्रिक आणि रोजगारक्षम अभ्यासक्रमासह उच्च शिक्षण, व्यावसायिक प्रशिक्षण आणि कौशल्य उपक्रम उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करतो. भारतभरातील हजारो तरुणांना आजवर आमच्या या उपक्रमाचा लाभ झाला आहे आणि त्यांना रोजगार मिळाला आहे किंवा त्यांनी स्वत:चा व्यवसाय सुरू केला आहे.”

अशोकची कथा

अशोक (खासगीपणा जपण्यासाठी नाव बदलले आहे) हा पुण्यातील खडी येथील मुल्ला रोड झोपडपट्टीत राहतो. एसओएस चिल्ड्रन्स विलेजेस आणि एचएसबीसी सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटच्या युथ स्किलिंग उपक्रमात त्याची नोंदणी करण्यात आली होती. त्याचे वडील एका टेलिकॉम कंपनीच्या आऊटलेटमध्ये सेल्समन आहेत तर आई जवळच्या घरांमध्ये घरकाम करते. अनेक वर्षे हे कुटुंब आर्थिकदृष्ट्या कसेबसे दिवस काढत आहे. अशात अशोक 12 वीची परीक्षा उत्तीर्ण झाला. त्याला पुढे शिक्षण घ्यायचे होते मात्र कॉलेजला जाण्याचे स्वप्न अधुरे सोडून त्याने कुटुंबाला हातभार लावण्यासाठी छोटीमोठी कामं सुरू केली. तो आता एसओएस-एचएसबीसी यूथ स्किलिंग प्रोग्रामच्या माध्यामातून पुण्यातील एका कम्प्युटर इन्स्टिट्यूटमध्ये डिप्लोमा इन कम्प्युटर हार्डवेअरचा कोर्स करतो आहे. तो अत्यंत प्रामाणिकपणे आणि निष्ठेने हे शिक्षण घेत आहे.

लॉकडाऊन सुरू झाल्यापासून अशोकने ऑनलाइन क्लासेससाठी मित्राकडून लॅपटॉप मिळवला आहे आणि इन्स्टिट्यूटने पुरवलेल्या साहित्याचा वापर करून तो ऑनलाइन शिक्षण घेतोय. तो जिथे राहतो त्या झोपडपट्टीत बऱ्याचदा नेटवर्क कनेक्टिव्हिटीचा त्रास असतो. त्यामुळे त्यामुळे क्लासमध्ये हजर राहणे अशक्य होते. पण, इन्स्टिट्यूटमधील त्याचे शिक्षक फारच सांभाळून घेतात आणि त्याला शक्य त्या सर्व प्रकारे साह्य करतात. कम्प्युटर मेंटनन्स आणि रीपेअरमध्ये हा कोर्स पूर्ण करून मानाची नोकरी मिळवण्यासाठी अशोक प्रचंड मेहनत घेत आहे.

अशोक म्हणतो  ,”हा ट्रेनिंग अभ्यासक्रम करताना माझ्या लक्षात आलं की कम्प्युटर हार्डवेअरच्या क्षेत्रात करिअच्या चांगल्या संधी उपलब्ध आहेत. मात्र, मला आधी या क्षेत्राबद्दल काहीच माहिती नव्हती. पण, माझे शिक्षक आणि स्पॉन्सर्स ज्या पद्धतीने पाठिंबा देतात, त्यासाठी मी आभारी आहे. हा कोर्स पूर्ण केल्यानंतर माझ्यासमोर एक उज्ज्वल भविष्य असेल, असे मला वाटते. या कौशल्यामुळे मी माझ्या पायावर उभा राहू शकतो आणि सन्मानाते माझ्या कुटुंबाला पाठिंबा देऊ शकतो.”