राज्यातील ५२ हजार रेशन दुकानदार संपावर

धान्य वितरण केले बंद पुणे : कोरोना विषाणूंचा संसर्गाचा धोका असतानाही रेशन दुकानदार धान्य वितरणाचे काम करीत आहेत. त्यांच्या आरोग्याचा तसेच जीवाचा प्रश्न आहे. त्यामुळे त्यांना शासनाने विमा संरक्षण

धान्य वितरण केले बंद

पुणे : कोरोना विषाणूंचा संसर्गाचा धोका असतानाही रेशन दुकानदार धान्य वितरणाचे काम करीत आहेत. त्यांच्या आरोग्याचा तसेच जीवाचा प्रश्न आहे. त्यामुळे त्यांना शासनाने विमा संरक्षण द्यावे अशी मागणी होत आहे. मात्र शासनाने त्याकडे दुर्लक्ष केल्याने राज्यातील ५२ हजार रेशन दुकानदार संपावर गेले आहेत. सोमवारपासून (दि. १) सुरू आहे. त्यामुळे राज्यात रेशनिंगच्या धान्याचे वितरण ठप्प झाले आहे.ऑल महाराष्ट्र फेअर प्राईस शॉपकीपर फेडरेशनतर्फे संप पुकारण्यात आला आहे. डॉक्टर, परिचारिका, पोलीस यांच्यासह अनेक घटक कोरोनाच्या संकटात सेवा देत आहेत. त्यामुळे त्यांचा कोरोना योद्धा म्हणून उल्लेख केला जातो. त्यांना शासनाने विमा संरक्षण दिले आहे. कोरोनाच्या महामारीमुळे लॉकडाऊन दरम्यान सर्व व्यवहार बंद असताना रेशन दुकानदारांनी शासनाच्या निर्देशानुसार गरजू गरीब घटकांना धान्य वितरित केले. अद्यापही याचे यंत्रणेच्या माध्यमातून शासन गरजू गरीब घटकापर्यंत धान्य पोहोच करीत आहे. त्यामुळे रेशन दुकानदार थेट हजारो लोकांच्या संपर्कात येतात. परिणामी त्यांनाही कोणाचा संसर्ग होण्याचा धोका आहे. अशा परिस्थितीत रेशन दुकानदार देखील कोरोना योद्धाच आहेत. त्यामुळे त्यांच्या आरोग्याची काळजी घेऊन त्यांचे मनोबल वाढविणे आवश्यक आहे. त्यांच्या जीवाचे बरे वाईट झाल्यास कुटुंबियांना आधार मिळावा म्हणून रेशन दुकानदारांना विमा संरक्षण देण्याची मागणी फेडरेशनतर्फे करण्यात आली आहे. त्याबाबत मुख्यमंत्री व अन्न नागरी पुरवठा मंत्री यांच्याकडे निवेदन देण्यात आले होते. त्यांच्याकडून त्याबाबतचा प्रस्ताव वित्त विभागाकडे सादर करण्यात आला. त्यांच्याकडून आरोग्य खात्याकडे प्रस्ताव पाठविण्यात आला. मात्र त्यांनी या प्रस्तावावर विचार केलेला नाही, असे फेडरेशनचे अध्यक्ष माजी खासदार गजानन बाबर यांनी सांगितले

"कोरोनाच्या काळात सेवा देणाऱ्या घटकांना शासन विमा कवच देत आहे. रेशन दुकानदार देखील शासनाचाच एक घटक म्हणून कार्यरत आहे. शासनाचा प्रतिनिधी म्हणून हे दुकानदार धान्य वितरण करीत आहेत. पुण्यात एका दुकानदाराला कोरोनाची बाधा झाली. त्यात त्याचा मृत्यू झाला. त्याचे कुटुंब उघड्यावर आले आहे."

            – गजानन बाबर, अध्यक्ष, ऑल महाराष्ट्र फेयर प्राईस शॉपकिपर फेडरेशन

."संपामुळे या दुकानदारांनी धान्य घेतले नसून त्याचे वितरण नाही थांबविले आहे. त्यामुळे गरजू व गरीब लोकांना धान्य मिळालेले नाही. शासनाने सहानुभूतीपूर्वक विचार करून रेशन दुकानदार व त्यांच्या मदतनीस यांना विमा संरक्षण द्यावे. यातून त्यांचे मनोबल उंचावण्यास मदत होणार आहे."

              – विजय गुप्ता, खजिनदार, आॅल महाराष्ट्र फेअर प्राईस शॉपकिपर फेडरेशन"