मावळमध्ये वीज कोसळून ४ जखमी; एका बैलाचा मृत्यू

    वडगाव मावळ : मावळ तालुक्यातील अनेक भागात बुधवारी (दि. ०२) विजांच्या गडगटासह पाऊस सुरू होता. चारच्या दरम्यान आंदर मावळ भागातील माळेगाव खुर्द येथील टिवई वस्तीत ४ जणांवर वीज कोसळली. या दुर्घटनेत घोणशेत येथील एका बैलाचा मृत्यू झाला तर ४ जण जखमी झाले.

    माळेगाव खुर्द येथील निखिल सोमनाथ गारे (वय १४), रेश्मा सोमनाथ गारे (वय २०,), सुरेश शंकर गारे (वय २२) व संगीता शंकर कोकाटे (वय ४२) अशी जखमींची नावे अाहेत. जखमींना तळेगाव दाभाडे येथील जनरल हॉस्पिटलमध्ये त्वरित दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले. जखमी चौघेजण मुंबई येथे राहायला असून ते गावाकडे फिरण्यासाठी आले होते. बुधवारी (दि. २) दुपारी टिवई परिसरातील जंगलात आंबे खाण्यासाठी गेले होते.

    अचानक मुसळधार पाऊस आल्याने आंब्याच्या झाडाखाली उभे होते. आंब्याच्या झाडावर वीज कोसळल्याने ४ जण जखमी झाले. जखमींची मावळचे आमदार सुनिल शेळके यांनी भेट देऊन त्यांना सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले. तहसीलदार मधुसूदन बर्गे यांनी जखमींची चौकशी करुन त्यांना धीर दिला.