मास्क न घालणाऱ्या नागरिकांवर कारवाई ; ६३ हजार ३०० रूपये दंड वसूल

भिमाशंकर : आंबेगाव तालुक्यात कोरोनाचा संसर्ग वाढत असताना लोकांचे विनाकारण व मास्क न घालता बाहेर पडणाऱ्यांचे प्रमाण अधिक असल्याने पोलीसांनी कारवाई करण्यास सुरूवात केली आहे. घोडेगाव पोलीस ठाण्याचे हद्दीतील नागरिकांकडून ६३ हजार ३०० रूपये दंड वसूल केला असल्याची माहिती सहायक पोलीस निरीक्षक प्रदिप पवार यांनी सांगितले.

आंबेगाव तालुक्यात कोरोनाबाधित रूग्णांच्या संख्येने एक हजाराचा टप्पा पार केला आहे. तर मृत्यूचा आकडा ३१ पर्यंत पोहोचला आहे. मात्र तालुक्यातील नागरिक अजूनही बेफिकीर असल्याचं पाहायला मिळत आहे. घोडेगाव पोलीस ठाण्याचे हद्दीत दि. २९ व ३० रोजी केलेल्या कारवाईमध्ये मास्क न घालणा-या २०७ जणांवर कारवाई करत ५९ हजार ४०० रूपये दंड, वाहतूक कारवाईतील १५ जणांकडून ३ हजार ९०० सोशल डिस्टन्स न पाळणा-या सहा जणांवर १८८ व २६९ कलमांन्वये कारवाई करण्यात आली आहे, अशा २२८ जणांकडून ६३ हजार ३०० रूपये दंड घोडेगाव पोलीसांनी वसूल केला आहे.

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी प्रवास करताना, फिरताना आपल्या तोंडावर मास्क घालणे आवश्यक आहे. तथापि काही नागरिक मास्क न घालता फिरताना दिसतात. हा दंड आकारताना कुणी हुज्जत घातली तर संबंधित व्यक्तिविरूध्द १८१ कलमान्वये कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. मास्क न घालणा-या व्यक्तिकडून पाचशे रूपये तर सार्वजनिक थुंकताना आढळल्यास एक हजार रूपये दंड आकारण्याचे आदेश विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिले असल्याचे सहायक पोलीस निरीक्षक प्रदिप पवार यांनी सांगितले.