कोरोनाने दगावलेले ६६ टक्के लोक हायपर टेन्शनग्रस्त; महापालिका आयुक्त राजेश पाटील यांचा दावा

तिसऱ्या लाटेला सामोरे जाताना नागरिकांपर्यंत माहितीचा प्रसार योग्यरितीने होणे गरजेचे आहे. लोकांमध्ये जागृती करणे आवश्यक आहे. लहान मुले, किशोरवयीन मुले, तरुण, ज्येष्ठ नागरिक, उच्चवर्णीय, मध्यमवर्गीय, झोपडीधारक, स्थलांतरित नागरिक यांपर्यंत पोहोवण्यासाठी 'कम्युनिकेशन चॅनेल' सुरू करण्याचा विचार सुरु आहे.

    पिंपरी: पहिल्या लाटेपेक्षा दुसऱ्या लाटेत कोरोना विषाणूचे स्वरूप वेगळे होते. संसर्गाचे प्रमाण जास्त होते. खूप कमी कालावधीत रुग्णाची प्रकृती चिंताजनक होत होती. या नव्या विषाणूचे स्वरुप समजून घेण्यात तफावत राहिली. नागरिकही गाफील राहिले. कोरोना उपचार पद्धतीच्या नियमावलीचे काटेकोरपणे पालन झाले नाही. नागरिकांनी आजार अंगावर काढला. घरीच उपचार केले. अति आत्मविश्वास नढला. परिणामी, दुसऱ्या लाटेत रुग्णसंख्या आणि मृत्यूसंख्या वाढली. एप्रिल, मे या दोन महिन्यात कोरोनाने १ हजार ७२७ जणांचा बळी घेतला. त्यातील ३० टक्के रुग्णांचा पूर्वीचा कोणताही आजार (को – मॉर्बिड)नव्हता. केवळ ‘को – मॉर्बिड’ नागरिकांनाच धोका असल्याचे खरे नाही, अशी माहिती महापालिका आयुक्त राजेश पाटील यांनी दिली. कोरोनाने मृत्यू झालेल्या ६६ टक्के लोकांना हायपर टेन्शनचा त्रास होता असा दावाही त्यांनी केला.

    पिंपरी – चिंचवड सिटीझन फोरम तर्फे आयोजित ऑनलाइन संवादात आयुक्त पाटील बोलत होते. राजेश पाटील म्हणाले, पहिल्या, दुसऱ्या लाटेतील अनुभव लक्षात घेऊन नागरिकांनी काळजी घेतली पाहिजे. एप्रिलपासून दुसरी लाट सुरू झाली. एप्रिल, मे महिने कठीण होते. भीषण परिस्थिती होती. मृत्यूचे प्रमाण वाढले होते. नेहरूनगर येथील जम्बो, वायसीएमएच, आदित्य बिर्ला आणि डॉ. डी.वाय. पाटील हॉस्पिटलमध्ये एप्रिल, मे महिन्यात १ हजार ७२७ जणांचे मृत्यू झाले. त्यातील १५०० मृत्यूचे विश्लेषण केले. मृत्यू झालेले २१ टक्के लोक ४५ वर्षाखालील होते. ३२ टक्के लोक ४६ ते ६० वयोगटातील होते. तर, ४७ टक्के लोक ६० वर्षापुढील होते.

    ४५ वर्षाखालील १४ टक्के लोक व्याधीग्रस्त नव्हते. कोणताही आजार नसताना १४ टक्के तरुणांचा केवळ कोरोनामुळे मृत्यू झाला. ४६ ते ६० वयोगटातील १५ टक्के लोकांनाही कोणताही दुर्धर आजार नव्हता. कोणताही आजार नसलेले १५ ते ३० वयोगटातील २ टक्के लोकांचा मृत्यू झाला. दुर्धर आजार नसतानाही झालेल्या मृत्यूमध्ये २९ टक्के पुरुष तर १४ टक्के महिला आहेत. मृत्यू झालेले ६६ टक्के लोक हायपर टेन्शनग्रसत तर ४४ टक्के लोक मधुमेहग्रस्त असल्याचे दिसून आले. ऑक्सिजन पातळी ८० च्या खाली पोहोचलेल्या ३३ टक्के जणांचा मृत्यू झाला. या पातळीमध्ये फ्फुफ्फुसांना मोठ्या प्रमाणात इजा पोहोचल्या असतात. ६० च्या खाली ऑक्सिजन पातळी असलेले १२ टक्के लोक होते. ६० ते ८० च्या दरम्यान २१ टक्के आणि ८० ते ९० ऑक्सिजन पातळी असलेले ३७ टक्के लोक होते. ९० च्या खाली ऑक्सिजन पातळी येणे धोकादायक आहे. मृत्यू झालेल्या ७० टक्के लोकांची ऑक्सिजन पातळी ९० च्या खाली आली होती. ते उशिरा रुग्णालयात दाखल झाले होते. ८० च्या खाली ऑक्सिजन पातळी असलेले रुग्ण जास्त गंभीर होते. लोकांनी आजार अंगावर काढला. घरीच उपचार सुरु केले. कोणती औषधे घ्यायची याच्या माहितीचा प्रसार अधिक झाल्याने अनेकांनी घरीच उपचार केले. शेवटच्या टप्प्यात रुग्णालयात दाखल झालेल्या रुग्णांना वाचविणे मुश्कील बनले. व्हेंटिलेटरवर गेलेले रुग्ण बरे होण्याचे प्रमाण २५ टक्के आहे.पहिल्या लाटेत संसर्गाचे प्रमाण कमी होते. दुसऱ्या लाटेत संसर्गाचे प्रमाण अधिक होते. घरातील एखाद्या सदस्याला लागण झाल्यास सर्वांना कोरोनाची बाधा होत होती. कुटुंबच्या कुटुंबच रुग्णालयात दाखल होत होती. त्याच्या संपर्कातील लोकांनाही कोरोनाची लागण झाली. प्रसार जास्त असल्याने दिवसाची रुग्णसंख्या ३ हजारांपर्यंत गेली होती, असेही राजेश पाटील यांनी नमूद केले.

    निर्बंध शिथिल केल्याने रुग्ण वाढण्याचा धोका रुग्ण वाढण्याचा धोका

    तिसऱ्या लाटेला सामोरे जाताना नागरिकांपर्यंत माहितीचा प्रसार योग्यरितीने होणे गरजेचे आहे. लोकांमध्ये जागृती करणे आवश्यक आहे. लहान मुले, किशोरवयीन मुले, तरुण, ज्येष्ठ नागरिक, उच्चवर्णीय, मध्यमवर्गीय, झोपडीधारक, स्थलांतरित नागरिक यांपर्यंत पोहोवण्यासाठी ‘कम्युनिकेशन चॅनेल’ सुरू करण्याचा विचार सुरु आहे. वेगवेगळ्या शाळांमधील शिक्षकांची टीम तयार केली आहे. कॉलेज विद्यार्थ्यापर्यंत ऑनलाइन माध्यमातून पोहोचणार आहेत. विरंगुळा केंद्रामार्फत ज्येष्ठ नागरिकांपर्यंत जनजागृती केली जाणार आहे. शहरातील २७ लाख लोकांपैकी फक्त ५ लाख जणांना लस दिली आहे. त्यातील १ लाख लोकांना २ डोस दिले आहेत. उर्वरित लोक असुरक्षित आहेत. निर्बंध शिथिल केल्याने रुग्ण वाढण्याचा धोका असल्याचेही आयुक्त राजेश पाटील म्हणाले.