students in school

प्रत्यक्ष शाळा सुरु करण्याकरिता शाळेतील १०० टक्के शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची कोरोना टेस्ट करणे बंधनकारक आहे. त्याचबरोबर सर्व शिक्षकांचे लसीकरण होणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांनी शाळेत उपस्थित राहण्यापूर्वी पालकांची लेखी संमती आवश्यक असेल.

    पिंपरी: कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने शहरी भागाताली शाळा सुरु करण्यास राज्य शासनाने मान्यता दिली आहे. त्यामुळे पावणे दोन वर्षांनी प्रत्यक्ष विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत शाळा सुरु होणार आहेत. सोमवार (दि.४) पासून पिंपरी – चिंचवड शहरातील ८ वी ते १२ वीचे वर्ग सुरु होणार आहेत.विद्यार्थ्यांना शाळेत उपस्थित राहण्यापूर्वी पालकांची लेखी संमती शाळा प्रमुखांना घ्यावी लागणार आहे.

    आयुक्त राजेश पाटील यांनी याबाबतचे आदेश जारी केले आहेत. पिंपरी – चिंचवड शहरात एकूण ३ लाख ५० हजार विद्यार्थी आहेत. त्या पैकी आठवी ते बारावीच्या विद्यार्थ्यांची संख्या ४९ हजार ९२४ आहे. महापालिका क्षेत्रातील सर्व प्रकारच्या ८ वी ते १२ वीच्या शाळा सोमवारपासून सुरु होणार आहे. त्यासाठी काही अटी असणार आहेत. त्यात राज्य शासनाच्या सूचनांचे पालन करणे बंधनकारक आहे. स्वच्छता विषयक सुविधा, जंतुनाशक साबण, पाण्याची उपलब्धतता, विद्यार्थी वाहतूक करणाऱ्यां बसचे निर्जंतुकीकरण, शिक्षक – शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना कोरोनासाठीची ४८ तासापूर्वीची ‘आरटीपीसीआर’ चाचणी बंधनकारक आहे. या पार्श्वभूमीवर सर्व माध्यमाच्या शाळा व्यवस्थापनासह महापालिकेचीही लगबग सुरू झाली आहे.

    वर्ग खोली तसेच स्टाफ रूममधील बैठक व्यवस्था शारीरिक अंतराच्या नियमानुसार असावी. वर्गामध्ये एका बाकावर एक विद्यार्थी या प्रमाणे नावानिशी बैठक व्यवस्था शाळांना करावी लागणार आहे.शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची कोरोना टेस्ट निगेटीव्ह असली पाहिजे. कोणत्याही प्रकारची लक्षणे नसलेल्या कर्मचाऱ्यांनाच कामावर हजर रहावे लागणार आहे. प्रत्यक्ष शाळा सुरु करण्याकरिता शाळेतील १०० टक्के शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची कोरोना टेस्ट करणे बंधनकारक आहे. त्याचबरोबर सर्व शिक्षकांचे लसीकरण होणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांनी शाळेत उपस्थित राहण्यापूर्वी पालकांची लेखी संमती आवश्यक असेल. शाळा व्यवस्थापन समितीने पालकांशी चर्चा करावी. आजारी असलेल्या मुलांना पालकांनी शाळेत पाठवू नये. विद्यार्थ्यांना पालकांच्या संमतीने घरी राहून देखील अभ्यास करता येईल.

    शाळा सुरु करण्यापूर्वी शाळा निर्जंतुकीकरण, तापमान मोजणीसाठीची गन, डिजिटल थर्मामीटर, हात धुण्याची व्यवस्था, सुरक्षित अंतराचे पालन करणे आवश्यक आहे. शाळेत दर्शनी भागावर मास्कचा वापराबाबत फलक लावावे लागणार आहेत. सुरक्षित अंतर राखण्यासाठी विशिष्ट चिन्हे लावण्याची सुचना करण्यात आली आहे.