आणेघाटात भीषण अपघात; एकजण ठार

    बेल्हे : नगर कल्याण महामार्गावर नगरहून कल्याणकडे जाणाऱ्या चारचाकी गाडीची दगडाला धडक दिल्यामुळे झालेल्या अपघातामध्ये एकजण जागीच ठार झाला आहे. ही घटना शनिवारी मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास घडली.

    याबाबत आळेफाटा पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, शनिवारी मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास आणे गावच्या हद्दीत अहमदनगर कल्याण महामार्ग क्रमांक २१ वर आणे घाटाच्या पहिल्या वळणावर चारचाकी चालक मनोज भाऊसाहेब शिंदे ( वय ३८ वर्षे राहणार नेवासा बुद्रुक तालुका नेवासा जिल्हा अहमदनगर) यांच्या ताब्यातील चारचाकी भरधाव वेगात महामार्गाच्या कडेला असलेल्या डोंगराला धडकून अपघात झाला. अपघातात चारचाकीचे मालक अमोल रमेश लोखंडे ( वय २७ वर्ष राहणार नेवासा तालुका नेवासा जिल्हा अहमदनगर ) यांना डोक्यास गंभीर मार लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.

    याबाबतची फिर्याद दत्तात्रय भाऊसाहेब वैराळ (वय ३१ वर्ष, राहणार खडका फाटा तालुका नेवासा जिल्हा अहमदनगर) यांनी आळेफाटा पोलिस ठाण्यात दिली असून, या फिर्यादीवरुन कारचालक मनोज भाऊसाहेब शिंदे यांच्यावर आळेफाटा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.