लग्नानिमित्त नागरिकांची गर्दी जमल्याने  नवरदेवाच्या वडिलांवर गुन्हा दाखल

मंचर :  आंबेगाव तालुक्यातील नांदूर येथे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर असलेले नियम न पाळता मुलाच्या लग्नानिमित्त गर्दी केल्याप्रकरणी नवरदेवाचे वडील नामदेव लक्ष्मण जाधव यांच्या विरोधात मंचर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आंबेगाव तालुक्यात कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधित क्षेत्रात विनापरवाना फिरणे, गर्दी जमवणे, दुकाने उघडी ठेवणे यासाठी बंदी आहे. कोरोनाचा प्रसार वाढू नये म्हणून प्रशासनाने तात्काळ कोरोना रुग्ण सापडलेल्या गावात विविध उपाययोजना राबविल्या आहेत. नांदूर गावात कोरोनाचा रुग्ण सापडला असल्याने मंचर पोलीस ठाण्याचे पोलीस जवान के.एस.पाबळे, प्रशांत भुजबळ हे पेटड्ढोलिंग करत असताना त्यांना नामदेव लक्ष्मण जाधव यांनी आपल्या मुलाच्या लग्नानिमित्त घरासमोर लोकांची गर्दी केली होती. त्यावेळी सोशल डिस्टन्स नियम न पाळता कुठलीही काळजी घेतली नव्हती. याप्रकरणी मंचर पोलिसांनी संबधितांवर कारवाई केली असून  राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायदा व साथीचे रोग कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस जवान के. एस.पाबळे यांनी फिर्याद दाखल केली आहे. पुढील तपास पोलीस जवान अजित मडके करत आहे.