विहिरीत आढळला तरुणीचा मृतदेह; परिसरात खळबळ

    बेल्हे : यादववाडी (ता.जुन्नर) येथील गायकवाड वस्तीवरील एका तरुणीचा मृतदेह विहिरीत आढळून आला. प्रांजली दत्तात्रय पिंगळे (वय २१) असे आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव आहे.

    याबाबत आळेफाटा पोलिसांनी माहितीनुसार, यादववाडी येथील गायकवाड वस्तीवर राहात असलेले दत्तात्रय पिंगळे बुधवारी (दि.१) पहाटेच्या सुमारास झोपेतून उठले असता त्यांना त्यांची मुलगी प्रांजली घरात नसल्याचे निदर्शनास आले. त्यांनी घराबाहेर पाहणी केली. तसेच घराजवळील विहिरीजवळ पाहिले असता त्यांना विहिरीत चप्पल तरंगताना दिसली. संशय आल्याने त्यांनी बेल्हे पोलीस दूरक्षेत्राला माहिती दिली.

    पोलिसांनी घटनास्थळी भेट दिल्यावर विहिरीत तरुणीचा मृतदेह आढळून आला. स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने मृतदेह विहिरीतून बाहेर काढण्यात आला. याबाबत पोलिसांनी आकस्मित मृत्यूची नोंद केली आहे. पुढील तपास आळेफाटा पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मधुकर पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार अमित पोळ करत आहेत.