लघूशंकेसाठी कारमधून उतरले अन् होत्याचं नव्हतं झालं…

दररोज जमा झालेली रक्कम ते बँक खात्यावर टाकत असत. परंतु, गेल्या एक महिन्यांची रोकड त्यांनी बँकेत भरणा केली नव्हती. त्यातच त्यांना मुळगावी जायचे होते. त्यामुळे त्यांनी जमलेली ९७ लाख रुपयांची रोकड बॅगेत भरून नातेवाईकांकडे देण्याचे ठरविले.

    पुणे : मार्केटयार्डमधील एका मसाले व्यावसायिकाच्या ड्रायव्हरने कारमधील ९७ लाखांची रोकड अन् कार घेऊन पोबारा (Car and 97 Lakhs Cash Stolen) केल्याचा खळबजनक प्रकार उघडकीस आला. संबंधित व्यावसायिक लघुशंकेसाठी कारमधून उतरताच त्याने डाव साधत कार व रोकड पळ घेऊन काढला. सोमवारी रात्री कल्याणीनगर परिसरात ही घटना घडली.

    याप्रकरणी ५० वर्षीय व्यावसायिकाने येरवडा पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार कारचालक विजय माधव हलगुंडे (वय २२, रा. कात्रज-कोंढवा रोड) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे सुखामेवा व मसालाच्या होलसेल विक्रेते आहेत. दरम्यान, मार्केटयार्ड परिसरात त्यांचा व्यावसाय आहे. ते एनआयबीएम रस्त्यावर राहतात. ते मूळचे हरियाणा येथील आहेत. त्यांनी त्यांच्या कारवर चालक म्हणून विजय याला ठेवले होते. त्याला दहा महिन्यांपूर्वी नोकरीस ठेवले होते. दरम्यान, दररोज जमा झालेली रक्कम ते बँक खात्यावर टाकत असत. परंतु, गेल्या एक महिन्यांची रोकड त्यांनी बँकेत भरणा केली नव्हती. त्यातच त्यांना मुळगावी जायचे होते. त्यामुळे त्यांनी जमलेली ९७ लाख रुपयांची रोकड बॅगेत भरून नातेवाईकांकडे देण्याचे ठरविले.

    त्यानुसार, सोमवारी कल्याणीनगर येथील नातेवाईकांकडे रोकड देण्यासाठी सायंकाळी कारचालक विजय याला घेऊन निघाले. परंतु, सायंकाळी साडे सात वाजण्याच्या सुमारास पाऊस आल्याने ट्राफिक जाम झाले होते. त्यामुळे ते कॅम्प परिसरातून कोरेगांव पार्क मार्गे कल्याणीनगरकडे निघाले. एचएसबीसी कंपनीजवळ आल्यानंतर पावणे नऊ वाजण्याच्या सुमारास त्यांना लघुशंका आल्याने त्यांनी कार बाजूला घेण्यास सांगितली.

    विजयने कार बाजूला घेतल्यानंतर तक्रारदार हे लघुशंका करण्यास गेले. त्यांनी रोकड असलेली पिशवी कारमध्येच ठेवली होती. तीच संधी साधत विजयने कारसह रोकड घेऊन पोबारा केला. लघुशंका करून पाठीमागे पाहिल्यानंतर तक्रारदारांना कार नसल्याचे दिसून आले. त्यांनी लागलीच एका दुचाकीस्वार महिलेची मदत घेऊन त्यांच्यासोबत कारचा शोध घेतला. त्यावेळी त्यांना काही अंतरावर कार दिसून आली. मात्र, कारमध्ये पैसे अन चालक नसल्याचे दिसले. त्यावेळी त्यांना चालकाने पैसे घेऊन पळ काढल्याची समजले. त्यांनी पोलीसांना घटनेची माहिती दिली. अधिक तपास सहाय्यक निरीक्षक रविंद्र आळेकर हे करत आहेत.