मोठी बातमी ! मुळशीत प्युरिफायर बनवणाऱ्या कंपनीला भीषण आग; १७ जणांचा मृत्यू, अनेक मजूर बेपत्ता

  पुणे : मुळशी तालुक्यातील प्युरीफायर बनवणाऱ्या एका कंपनीला भीषण आग लागली. या आगीत आत्तापर्यंत एकूण १७  मजूरांचा मृत्यू झाला. तर अनेक मजूर बेपत्ता असल्याची माहिती दिली जात आहे. ही आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दलाच्या ८ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. सध्या ही आग आटोक्यात आणण्यात अग्निशमन विभागाला यश आले आहे.

  मुळशी तालुक्यातील अरवडे गावाजवळ ही घटना घडली. या कंपनीत सुमारे ३७ मजूर काम करत होते. त्यापैकी १७ मजूरांचा यामध्ये मृत्यू झाला. त्यामध्ये १५ महिला तर २ पुरुषांचा समावेश आहे. यातील मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. सध्या ही आग आटोक्यात आणण्यात आली असून, कूलिंगचे काम सुरु आहे.

  दरम्यान, या कंपनीत अडकलेल्या मजुरांची सुटका करण्यासाठी जेसीबीच्या साह्याने भिंती फोडून त्यांना बाहेर काढण्याचाही प्रयत्न करण्यात आला, अशी माहिती तहसीलदार अभय चव्हाण यांनी दिली.

  आगीचे कारण अस्पष्ट

  ज्या कंपनीला ही भीषण आग लागली. त्यामध्ये वॉटर प्युरिफायरचे उत्पादन केले जाते. जेव्हा ही आग लागली तेव्हा ती मोठ्या प्रमाणावर भडकली होती. त्यामुळे अनेक मजूर कंपनीत अडकले होते. मात्र, ही आग नेमकी कशामुळे लागली याची माहिती अद्याप मिळू शकली नाही.

  शोधकार्य सुरु

  जेव्हा प्लॅस्टिक पॅकिंग सुरु होते त्यादरम्यान कंपनीत आग लागली. या आगीमुळे मोठा धूर निर्माण झाल्याने महिला मजूरांना सुरक्षितस्थळी जाता आले नाही. आम्ही १७ जणांचे मृतदेह काढले आहेत. त्यापैकी १५ महिला आणि २ पुरुषांचा समावेश आहे. सध्या कूलिंग आणि शोधकार्य सुरु आहे, अशी माहिती पीएमआरडीएचे मुख्य अग्निशमन अधिकारी देवेंद्र पोटफोडे यांनी दिली.