शिक्रापूरात अज्ञाताकडून किराणामाल दुकानाला आग

शेजारील किराणा दुकानदारावर दुकान मालकाचा संशय
शिक्रापूर : शिक्रापूर (ता. शिरूर) येथील मलठण फाटा परिसरात दुकानाचा पत्रा उचकटून फाटक्याच्या सहाय्याने एका किराणामाल दुकानाला आग लावल्याची घटना घडली असून एका अज्ञात व्यक्तीवर आग लावल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून दुकान मालकाने शेजारील दुकानदारावर संशय असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

शिक्रापूर (ता. शिरूर) येथील मलठण फाटा परिसरातील सिद्धिविनायक नगर येथे तेजस नरवडे यांचे सिद्धिविनायक ट्रेडिंग कंपनी नावाचे किराणा मालाचे दुकान असून त्यांच्या शेजारील राहुल किराणा सुपर मार्केट या दुकानदारासोबत दुकानातील गिऱ्हाईक कमी जास्त होत असल्याने नेहमीच किरकोळ वाद होत असतात. सोळा ऑगस्ट रोजी रात्रीच्या वेळी नरवडे हे दुकान बंद करून शेजारील घरात झोपलेले असताना पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास शेजारील नागरिकांनी दुकानाला आंग लागली असल्याचे सांगत नरवडे यांना उठविले होते. त्यावेळी नरवडे यांनी दुकानाकडे येत शटर उघडले असता त्यांना दुकानातून फटाक्यांचा आवाज येत असल्याचे तसेच दुकानाच्या पत्र्यावरून एक इसम पळून गेल्याचे दिसले. त्यावेळी नरवडे व इतरांनी पाण्याच्या सहय्याने आग वीजवित पाहणी केली असता दुकानाचा पत्रा उचकटलेला तसेच दुकानात ठिकठिकाणी फटाके पेटवून टाकले असल्याचे आढळून आले. याबाबत आग लागलेल्या सिद्धिविनायक ट्रेडिंग कंपनी या दुकानाचे मालक तेजस मच्छिंद्र नरवडे रा. सिद्धिविनायक नगर शिक्रापूर (ता.शिरूर) जि. पुणे यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली असून नरवडे यांनी फिर्यादीमध्ये त्याच्या दुकानाशेजारील राहुल किराणा सुपर मार्केट या दुकानदारावर संशय असल्याचे म्हटले आहे. तर शिक्रापूर पोलिसांनी अज्ञात व्यक्तीवर गुन्हा दाखल केला असून सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक सदाशिव शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक जयप्रकाश चव्हाण हे करत आहे.