पुण्यातील बुधवार पेठेत कायदा सुव्यवस्थेची दाणादाण, तडीपार गुंडाकडून फौजदाराचा खून, शहरात खळबळ

गुंड प्रवीण महाजनवर खुनाचा प्रयत्न करण्याचे गुन्हे दाखल असल्यामुळे त्याला यापूर्वी दोनदा तडीपार करण्यात आले आहे. मात्र तरीही अद्दल न घडलेल्या या गुंडाने पुन्हा एका पोलिसावर हल्ला करून त्यांचा जीव घेतलाय. सहाय्यक फौजदार समीर सय्यद हे आपली ड्युटी संपवून घरी चालले होते.

    पुण्यात एका तडीपार गुंडाने सहाय्यक फौजदारावर हल्ला करून त्यांचा खून केल्याची घटना घडलीय. पुण्यातील बुधवार पेठेत मध्यरात्रीच्या सुमाराला हा प्रकार घडला. सहाय्यक फौजदार समीर सय्यद (वय ४८) यांच्यावर बुधवार पेठेतील श्रीकृष्ण टॉकिजजवळ जीवघेणा हल्ला करण्यात आला. याप्रकरणी फरासखाना पोलिसांनी तडीपार गुंड प्रवीण महाजन (वय ३४) ला अटक केलीय.

    गुंड प्रवीण महाजनवर खुनाचा प्रयत्न करण्याचे गुन्हे दाखल असल्यामुळे त्याला यापूर्वी दोनदा तडीपार करण्यात आले आहे. मात्र तरीही अद्दल न घडलेल्या या गुंडाने पुन्हा एका पोलिसावर हल्ला करून त्यांचा जीव घेतलाय. सहाय्यक फौजदार समीर सय्यद हे आपली ड्युटी संपवून घरी चालले होते. त्यावेळी श्रीकृष्ण टॉकिजजवळ त्यांची गाठ गुंड प्रवीणशी पडली. दोघांमध्ये बाचाबाची झाल्यानंतर गुंड प्रवीणने आपल्याजवळच्या चाकूने सय्यद यांच्यावर सपासप वार केले.

    यापैकी एक वार त्यांच्या गळ्याला लागला आणि ते रक्तबंबाळ अवस्थेत तिथं पडले. हे पाहून स्थानिकांनी गुंड प्रवीणला पकडलं. पोलिसांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेतली आणि सय्यद यांना रुग्णालयात दाखल केलं. मात्र या जीवघेण्या हल्ल्यात ते मृत्युमुखी पडले. पोलिसांनी गुंड प्रवीण महाजनला अटक केली असून या घटनेचा अधिक तपास पोलीस करत आहेत.