चाकण आणि खेड दरम्यान शासकीय रुग्णालय उभारावे

अभय भोर यांची मागणी मंचर : मंचर उपजिल्हा रुग्णालयात सर्व सुविधा रुग्णांना उपलब्ध करुन रुग्णालयाचे सशक्तीकरण करावे. किंवा उत्तर पुणे जिल्ह्यासाठी चाकण आणि खेडच्या दरम्यान सरकारने मोठे

अभय भोर यांची मागणी

मंचर :   मंचर उपजिल्हा रुग्णालयात सर्व सुविधा रुग्णांना उपलब्ध करुन रुग्णालयाचे सशक्तीकरण करावे. किंवा उत्तर पुणे जिल्ह्यासाठी चाकण आणि खेडच्या दरम्यान सरकारने मोठे अद्यावत सर्व सुविधायुक्त शासकीय रुग्णालय उभारावे,अशी मागणी छावा युवा संघटनेचे पुणे जिल्हा अध्यक्ष अभय भोर यांनी प्रसिद्धी पत्राद्वारे केली.

चाकण आणि खेड परिसरामध्ये औद्योगिक क्षेत्र मोठ्या प्रमाणात झाले आहे. मंचर,जुन्नर,आळेफाटा,चाकण,खेड या भागातील बहुसंख्य नागरिक पिंपरी चिंचवड येथील यशवंतराव चव्हाण हॉस्पिटल येथे उपचारासाठी जात असतात. परंतु सध्या कोरोना विषाणूमुळे यशवंतराव चव्हाण हॉस्पिटलमध्ये मोठ्या संख्येने रुग्ण असल्याने आलेले पेशंट पुणे येथील ससून रुग्णालयात पाठविले जातात.त्यामुळे ग्रामीण भागातुन येणाऱ्या रुग्णांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत.

– उपजिल्हा रुग्णालय सशक्तीकरण करावे

ग्रामीण भागातील लोकांना शहरांमध्ये उपचारासाठी येण्यासाठी कोणत्याही प्रकारची माहिती नसते.ओळख नसते. त्यामुळे त्यांना शहरात घाबरल्यासारखे होते.तसेच जवळपास घर किंवा गाव नसल्याने त्यांचे अतोनात हाल होतात. प्रत्येक वेळी खासगी गाडीने येणे परवडत नाही.चाकण,खेड परिसरामध्ये लोकसंख्या मोठ्या संख्येने वाढली आहे. आसपासच्या वाड्या वस्त्या मोठ्या प्रमाणात आहे.अनेक शेतकऱ्यांना शेतातील कामे करुन रुग्णालयांमध्ये हेलपाटे मारावे लागतात. मंचर उपजिल्हा रुग्णालयात सर्व वैद्यकीय सुविधा उपलब्ध करुन द्याव्यात,अशी मागणी जिल्हाध्यक्ष भोर यांनी केली आहे.