जेवणावरून १३ जणांच्या टोळक्याचा हॉटेल व्यावसायिकावर खुनी हल्ला

माझ्या पोरांना जेवण देत नाही का, तुला एवढा माज आला आहे का, तुला माहीत नाही का मी इथला भाई आहे. तुला आता संपवतोच, असे म्हणून कोयत्याने अमोल चव्हाण यांच्या डोक्यावर वार केले. त्यात चव्हाण गंभीर जखमी झालेत.

    पिंपरी: हॉटेलमध्ये जेवणासाठी गेलेल्या ग्राहकाने हॉटेल मालकासोबत जेवणावरून वाद घातला , वाद इतका टोकाला गेला की आरोपीने आपल्या साथीदारांना आणून हॉटेल व्यावसायिक तरुणावर खुनी हल्ला केल्याची घटना पिंपळे – निलख येथे घडली. आरोपी अंबादास याने माझ्या पोरांना जेवण देत नाही का, तुला एवढा माज आला आहे का, तुला माहीत नाही का मी इथला भाई आहे. तुला आता संपवतोच, असे म्हणून कोयत्याने अमोल चव्हाण यांच्या डोक्यावर वार केले. त्यात चव्हाण गंभीर जखमी झाले. फौजदार विजय भोंगळे तपास करत आहेत. या प्रकरणी पोलिसांनी तिघांना गजाआड केले आहे.

    अमोल धुमाळ, अक्षय राक्षे, अभि मोरे (सर्व रा. पिंपळे-निलख) अशी अटक केलेल्या तिघांची नावे आहेत. अंबादास पासलकर, राजू फडतरे आणि त्यांच्या सात ते आठ साथीदारांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अक्षय अशोक चव्हाण (वय २५, रा. बाणेर) असे खूनी हल्ला झालेल्या हॉटेल व्यावसायिक तरुणाचे नाव आहे. त्यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

    फिर्यादी चव्हाण यांचे बाणेर रोड, पिंपळे – निलख येथे हॉटेल आहे. मंगळवारी रात्री सव्वादहाच्या सुमारास आरोपी धुमाळ हा फिर्यादी चव्हाण यांच्या हॉटेलमध्ये जेवणासाठी गेला होता. त्यावेळी फिर्यादी चव्हाण आणि आरोपी धुमाळ यांच्यात जेवणाच्या कारणावरून वाद झाला. त्यानंतर धुमाळ तिथून निघून गेला. काही वेळेनंतर धुमाळ त्याच्या अन्य साथीदारांना घेऊन आला. सर्व आरोपींनी फिर्यादी चव्हाण यांना शिवीगाळ करून दगडाने मारहाण केली.