तरुणांच्या ग्रूपने मिटवली रुग्णांच्या जेवणाची भ्रांत ; कोरोनाबाधितांना पोहोच केल्या जात आहेत रोज ४०० थाळ्या

अनेक रुग्णालयांतून होणारी मागणी लक्षात घेता त्यांनी थाळींची संख्या वाढवली. सध्या दिवसाला दुपारी दोनशे व रात्री दोनशे थाळ्या रुग्णालयात पोहोच केल्या जात आहेत. येथील पत्रकार अमोल निलाखे यांना एका रुग्णालयातील गरजूंनी जेवणाची काही व्यवस्था होईल का, अशी विचारणा केली होती.

    बारामती : कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने सर्वसामान्य रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना जेवणाची सोय ‌ व्हावी, यासाठी बारामती शहरातील पाच तरुण दररोज ४०० जणांच्या जेवणाची सोय करत आहेत.सध्या लॉकडाऊन मुळे रुग्ण व त्यांच्या नातेवाइकांच्या जेवणाची गैरसोय होत होती. त्यामुळे बारामती शहरातील सचिन मत्रे,अमोल निलाखे ,कौशल गांधी, आनंद धोंगडे दिपक मत्रे या युवकांनी एकत्र येऊन रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना दररोज रुचकर जेवण देण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार सकाळी व सायंकाळी रुग्णालयात जेवण पोहच करण्यास सुरुवात केली.चांगले काम करण्यास सुरुवात केली तर लोक आपल्यासोबत येतात, हे ही यातून अधोरेखित झाले.

    अनेक रुग्णालयांतून होणारी मागणी लक्षात घेता त्यांनी थाळींची संख्या वाढवली. सध्या दिवसाला दुपारी दोनशे व रात्री दोनशे थाळ्या रुग्णालयात पोहोच केल्या जात आहेत. येथील पत्रकार अमोल निलाखे यांना एका रुग्णालयातील गरजूंनी जेवणाची काही व्यवस्था होईल का, अशी विचारणा केली होती. लाॅकडाऊन असल्याने बाहेर सगळेच बंद असल्याने खाण्याचे हाल होत होते. निलाखे यांनी घरूनच डबा पोहोच करण्यास सुरुवात केली. परंतु मागणी वाढल्यानंतर त्यांनी पत्रकार मित्र सचिन मत्रे, आनंद धोंगडे, कौशल गांधी, शुभम सोनवणे, किशोर ‌पवार, अजित खेडकर, उमेश दुबे आदींना सोबत घेत व्याप्ती वाढवली. रुग्णालयातून मोठ्या प्रमाणात थाळ्यांची मागणी होवू लागल्याने हे काम घरी होणे शक्य नसल्याचे लक्षात आले. वैभव जगताप यांनी दुपारी तर दिपक मत्रे यांनी रात्री जेवण तयार करून देण्याची जबाबदारी घेतली. सध्या सिल्व्हर ज्युबिली उपजिल्हा रुग्णालयात रुग्ण व नातेवाईकांना दिवसाला ४०० थाळ्या दिल्या जात आहेत. याशिवाय अनेकांनी या मित्र परिवाराकडे रुग्णांसाठी बिसलेरी पाणी बाॅटल, अंडी देण्यास सुरुवात केली. त्यामुळे रुग्णांना चांगली सेवा मिळू लागली आहे. कोरोना रुग्णांना दिल्या जाणाऱया गोळ्या-अौषधांमुळे त्यांना लवकर भूक लागते. या ग्रूपकडून त्यांना रोज दोन चपात्या, भाजी, वरण, भात, लोणचे असे रुचकर जेवण पुरवले जात आहे.

    या विधायक उपक्रमाला समाजातून मोठा प्रतिसाद मिळू लागला आहे. सूरतमधील एकानेही या ग्रूपला मदत केली. बारामतीतील अनेकांनी मदतीचा हात पुढे केला. समाजातील अन्य कोणाला मदत करायची असल्यास ७३५०९५९६९६ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.