आगीमध्ये घर गमावलेल्या लोकांना ‘नाम’कडून मदतीचा हात; नाना पाटेकरांनी ‘तो’ शब्द पाळला

आगीमध्ये घर गमावलेल्या लोकांच्या डोक्यावर हक्काचं छप्पर असावं म्हणून अभिनेते नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे यांच्या ‘नाम’ फाऊंडेशने पुढाकार घेतला आहे.

    पुणे : आगीमध्ये घर गमावलेल्या लोकांच्या डोक्यावर हक्काचं छप्पर असावं म्हणून अभिनेते नाना पाटेकर (Nana Patekar) आणि मकरंद अनासपुरे (Makarand Anaspure) यांच्या ‘नाम’ फाऊंडेशने (Naam Foundation) पुढाकार घेतला आहे. पुण्याजवळील बहुली गावात मार्च महिन्यामध्ये आग लागली होती. या आगीत अनेक संसार उघड्यावर आले होते. तब्बल १६ घरं या आगीत खाक झाली होती. त्या सर्वांना नेहमीच समाजकार्यात पुढे असणाऱ्या नाम फाऊंडेशनने मदतीचा हात दिला आहे. अभिनेते नाना पाटेकर यांनी या सर्वांना नव्या घरांच्या चाव्या दिल्या. दरम्यान यावेळी नाना पाटेकर यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

    नाना पाटेकर म्हणाले, “आम्हाला घरं जळाल्याची माहिती मिळाली होती. त्यामुळे आम्ही या गावात आलो. पावसाळ्याच्या आधी ती घरं जळाली होती. मी त्यांना धीर दिला तुम्ही रडू नका, आपण दोन-तीन महिन्यात घरं बांधून घेऊ, असे त्यांना सांगितले होते”.

    “यावेळी सर्व पक्षाची मंडळी सोबत होती. चांगलं करायचं म्हटल्यावर सगळी माणसं सोबत असतात. पक्ष बाजूला ठेऊन सर्व लोक एकत्र येतात हे मला बरं वाटतं. मी कुठल्या पक्षाचा नाही. जो चांगल काम करतो त्याला नमस्कार करायचा आणि जो वाईट काम करतो त्यालाही नमस्कार करायचा,” असंही ते म्हणाले.

    नाना पाटेकर यांनी खडकवासाला धरणातील गाळ काढण्याचे काम हाती घेतले आहे. अनेक लोक या कामात आहेत. सिमेवर सुद्धा ‘नाम’ने ने प्रकल्प उभारला आहे. लेहला वॉटर एटीएम सुद्धा उभारले आहेत, प्रत्येक कुटुंबाला एक-एक मशीन दिली आहे, याबाबत नाना पाटेकर यांनी माहिती दिली.