crime scene

    पुणे : दोन दिवसांपुर्वी घरकामासाठी ठेवलेल्या मोलकरीण महिलेने ज्येष्ठ महिलेला पिण्याच्या पाण्यात गुंगीचे औषध देऊन ८ लाखांचे दागिने घेऊन पोबारा केल्याचा प्रकार समोर आला आहे. तर दुसऱ्या एका घटनेत घरकाम करणाऱ्या महिलेने सव्वा लाख रुपये पळविले आहेत.

    याप्रकरणी ७३ वर्षीय ज्येष्ठ महिलेने येरवडा पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार, घरकाम करणाऱ्या महिलेवर गुन्हा दाखल केला आहे. रविवारी रात्री (२९ ऑगस्ट) ही घटना उघडकीस आली आहे.

    पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार या कल्याणीनगर येथील इंद्रपस्थ सोसायटीत राहतात. त्यांना घरकाम करण्यासाठी महिलेची गरज होती. त्यांनी शोध घेतल्यानंतर त्यांना २७ ऑगस्ट रोजी एक महिला कामासाठी मिळाली. तिला ठरवून घरकामासाठी ठेवले. दोन दिवस तिने घरातील काम केले. त्यानंतर २९ ऑगस्ट रोजी रात्री तक्रारदार यांना पिण्याच्या पाण्यात गुंगीचे औषध देऊन बेशुद्ध केले. तसेच, त्यांच्या घरातील ४ हजाराची रोकड व सोन्याचे दागिने असा ८ लाख ८ हजार रुपयांचा ऐवज जप्त केला आहे. अधिक तपास उपनिरीक्षक विशाल पाटील हे करत आहेत.

    दुसऱ्या घटनेत सव्वा लाखांचे दागिने चोरले

    कोरेगांव पार्क परिसरात देखील एका घरकाम करणाऱ्या महिलेने सव्वा लाखांचे दागिने नजर चुकवून चोरून नेले आहेत. याप्रकरणी ६९ वर्षीय ज्येष्ठ महिलेने तक्रार दिली आहे. ढोले पाटील रस्त्यावरील बाळकृष्ण अपार्टमेंटमध्ये राहतात. त्यांच्याकडे देखील एक कामगार महिला होती. तक्रारदार यांनी गळ्यातील मंगळसुत्र काढून ठेवले असता ते नजर चुकवून तिने चोरून नेले. अधिक तपास उपनिरीक्षक श्रीकांत सावंत हे करत आहेत.