शेताच्या बांधावरील झाडे का तोडली? असे विचारणाऱ्या एकास कुऱ्हाडीने मारहाण

  इंदापूर : शेताच्या बांधावरील झाडे का तोडली अशी विचारणा करणाऱ्या एकास कुऱ्हाड, लोखंडी रॉड व काठीने मारहाण केल्याच्या आरोपावरुन बाभूळगाव (ता.इंदापूर) येथील सहा जणांविरुध्द इंदापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
  सागर प्रताप आसबे, तुषार प्रताप आसबे, प्रताप भिकाजी आसबे, रामवर्मा वसंत आसबे, राजेंद्र फरतडे (सर्व रा. बाभुळगाव, ता.इंदापूर) अशी आरोपींची नावे आहेत. संतोष बाबू भोसले यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादी संतोष भोसले (वय-४० वर्षे) हे आपल्या पत्नी व मुलांसह बाभूळगाव येथे राहतात. बाभूळगावात राहणाऱ्या आसबे कुटुंबाची पाईपलाईन भोसले यांच्या जमीन गट क्र. १२८ मधून गेली आहे. तेथे सामाईक बांध आहे. बांधावर झाडे आहेत.
  सागर प्रताप आसबे याने भोसले यांनी त्याची पाईपलाईन फोडली, अशी तक्रार इंदापूर पोलीस ठाण्यात केली होती. त्यासाठी ३ जून रोजी भोसले यांना पोलीस ठाण्यात बोलावण्यात आले होते. तेथून घरी आल्यानंतर दुपारी भोसले शेतात पाणी देण्यासाठी गेले असता त्यांना बांधावरील झाडे तोडत असल्याचा आवाज आल्याने ते बांधाजवळ गेले. त्यावेळी ब्रम्हदेव भिकाजी आसबे हा कुऱ्हाडीने बांधावरील झाडे तोडत असल्याचे भोसले यांना दिसले.
  सागर प्रताप आसबे, तुषार प्रताप आसबे, प्रताप भिकाजी आसबे, रामवर्मा वसंत आसबे, राजेंद्र फरतडे हे जवळच थांबले होते. भोसले यांनी ब्रम्हदेव आसबे यास तुम्ही आमचे बांधावरील झाडे का तोडत आहात, अशी विचारणा केली असता या सर्वांनी भोसले यांना शिवीगाळ व दमदाटी केली. सागर आसबे याने लोखंडी रॉडने भोसले यांच्या डोक्यात मारहाण केली. तर तुषार आसबे याने ब्रम्हदेव आसबे याच्या हातातील कुऱ्हाड घेऊन भोसले यांच्या डोक्यात मारली. इतरांनी लाकडी काठीने लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. ‘पुन्हा आमच्या नादी लागला तर तुला जिवंत सोडणार नाही’ अशी धमकी दिली, असे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
  या घटनेनंतर तेथे आलेल्या भोसले यांच्या पत्नी व मुलाने उपचारासाठी इंदापूरातील उपजिल्हा शासकीय रुग्णालयात नेले. प्राथमिक उपचारानंतर पुढील उपचारासाठी इंदापूरातील खाजगी दवाखान्यात दाखल करण्यात आले आहे.
  दरम्यान, इंदापूर पोलीस ठाण्यातील हवालदार भारत जाधव व त्यांचे सहकारी मारहाण करणाऱ्या लोकांना वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यासाठी त्यांनी आरोपींवर योग्य कलमे लावलेली नाहीत, अशी तक्रार भोसले यांची पत्नी रेणुका भोसले यांनी अर्जाद्वारे इंदापूर पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकांकडे केली आहे. आरोपींवर योग्य कलमे लावण्यात यावीत. आपणास न्याय द्यावा, अशी मागणी या अर्जात त्यांनी केली आहे.
  प्राथमिक उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल
  आपल्या पतीला उपजिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी नेल्यानंतर प्राथमिक उपचारानंतर खाजगी दवाखान्यात दाखल करण्यात आले. ३ जूनपासून आजपर्यंत खाजगी रुग्णालयातील अतिदक्षता विभागात त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. त्यांच्या डोक्यावर गंभीर घाव आहे. टाके पडले आहेत. हा त्यांना जीवे ठार मारण्याचा प्रयत्न होता. त्यासाठी भा.दं.वि.३०७ नुसार गुन्हा  दाखल होणे आवश्यक होते. तथापि, तसे करण्यात आले नाही. आपण समक्ष अर्ज देण्यासाठी पोलीस ठाण्यात गेलो होतो. पोलिसांनी अर्ज स्वीकारला नाही. भा.दं.वि.कलम ३०७ लावण्यात यावे. सर्व आरोपींवर कडक कायदेशीर कारवाई व्हावी, अशी मागणी रेणुका भोसले यांनी केली आहे.