विवाहितेला मुलाचा सांभाळ करण्याचे आश्वासन देत केले लग्न, नंतर केला छळ; गुन्हा दाखल

    पिंपरी : विवाहिता एकटी असल्याचा गैरफायदा घेऊन तिला व तिच्या मुलाला सांभाळ करण्याचे आश्वासन देऊन तिच्याशी गुपचूप विवाह केला. मात्र, विवाहानंतर पतीसह सासरच्या मंडळींनी विवाहितेचा विविध कारणांवरून छळ केला. याप्रकरणी पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    प्रणव अरुण वायकर (वय २८), अरुण वायकर (दोघे रा. पिंपळवंडी, ता. जुन्नर), पुनम अरगळे, निलेश अरगळे (दोघे रा. पनवेल), संजय आवटे (रा. घाटकोपर, मुंबई) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. ३० वर्षीय विवाहितेने वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. हा प्रकार २०१८ ते फेब्रुवारी २०१९ या कालावधीत डांगे चौक थेरगाव येथे घडला.

    आरोपी प्रणव याने विवाहिता एकटी असल्याचा गैरफायदा घेऊन तुझा व तुझ्या मुलांचा सांभाळ करतो, असे खोटे आश्वासन देऊन तिच्याशी गुपचुप लग्न केले. विवाहितेने लग्नाचे फोटो प्रणवच्या नातेवाईकांना पाठवल्याचा राग मनात धरून प्रणवने विवाहितेला शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच विवाहितेने याबाबत सासऱ्यांना सांगितले असता त्यांनी देखील हे लग्न मान्य नसल्याचे सांगून विवाहितेला शिवीगाळ करून त्रास दिला. वाकड पोलीस तपास करत आहेत.