एटीएम मशीन फोडण्याच्या प्रयत्नात अल्पवयीन चोरटा, पोलिसांना मिळाली माहिती अन्…

    शिरूर : पुणे-नगर रस्त्यावरील साई कॉम्प्लेक्स इमारतीमधील स्टेट बँक ऑफ इंडियाचे एटीएम मशीन फोडण्याचा प्रयत्न करणाऱ्या अल्पवयीन चोरट्याला रात्रगस्तीवरील पोलिसांनी रंगेहात पकडले. पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला. या चोरट्याला बाल न्यायालयात हजर करण्यात येणार आहे, अशी माहिती शिरूरचे पोलीस निरीक्षक सुरेश कुमार राऊत यांनी दिली.

    सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण उंदरे, पोलीस नाईक प्रताप टेंगले व होमगार्ड सुनील चौरे हे रात्र गस्तीवर असताना साई कॉम्प्लेक्स या  इमारतीत स्टेट बँकेच्या एटीएमजवळ एक मुलगा त्यांना संशयास्पद हालचाली करीत असल्याचे दिसले. पोलिसांना पाहून तो पळून जाऊ लागला. पोलिसांनी पाठलाग करून त्याला पकडले. त्याच्याजवळून ड्रिल मशीन व हातोडी  जप्त करण्यात आली.

    पालकांनी मुलांकडे लक्ष द्यावे 

    त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता तो सधन कुटुंबातील आहे. त्याला शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवणूक करून अधिक पैसे कमावण्याच्या हेतूने त्याने एटीएम फोडण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, पालकांनी आपल्या मुलांवर लक्ष ठेवण्याचे आवाहन पोलिस निरीक्षक राऊत यांनी केले आहे.