धक्कादायक ! किरकोळ कारणावरून अल्पवयीन मुलाची गोळी झाडून हत्या

‘तू येथून जा नाहीतर मी तुझी पोलिसांत तक्रार करेल, असे म्हणाला आणि जीव गमावला.

    पिंपरी : मोबाईल शॉपीमधील साहित्याची डिलिव्हरी देण्यासाठी गेलेल्या दुकानदाराने त्याच्या 16 वर्षीय मुलाला दुकानात बसवले. त्यावेळी गुंड प्रवृत्तीच्या एका व्यक्तीने मोबाईल दुकानदाराच्या मुलासोबत बाचाबाची करून त्याच्यावर गोळी झाडून त्याचा खून केला. ही घटना रविवारी (दि. 15) रात्री शिवराजनगर येथे घडली. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे.

    ओवेज इसाक इनामदार (वय 16, रा. विजयनगर, काळेवाडी) असे खून झालेल्या अल्पवयीन मुलाचे नाव आहे. किरण शिवाजी वासरे (रा. रहाटणी) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. इसाक इस्माईल इनामदार (वय 40) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी इनामदार यांचे मेहूणे शाखरूख सय्यद यांचे रहाटणीतील शिवराजनगर येथे एक्‍सपर्ट मोबाइल शॉपी नावाचे दुकान आहे. रविवारी रात्री आठ वाजताच्या सुमारास फिर्यादी हिंजवडी येथे मोबाईल साहित्याची डिलिव्हरी देण्यासाठी गेले होते. त्यावेळी त्यांनी मुलगा ओवेज याला दुकानात थांबवले होते.

    त्यावेळी आरोपी मोबाईल चार्जरची कॉर्ड मागण्यासाठी दुकानात आला. आरोपी वारंवार दुकानात येऊन चार्जरची कॉर्ड मागत असे. त्यानंतर चार्जर घेऊन जात व त्याचे पैसे देत नसे. तो गुंड प्रवृत्तीचा असल्याने दुकानदार देखील त्याला जास्त विरोध करत नव्हते. रविवारी रात्री तो पुन्हा दुकानात आला. त्याने चार्जरची कॉर्ड मागत ओवेज याच्यासोबत बाचाबाची केली.

    आरोपी वासरे याच्याकडे पिस्तुल होती. फिर्यादी यांच्या मुलाने ‘येथे पिस्तुल का आणली’, अशी विचारणा करीत ‘तू येथून जा नाहीतर मी तुझी पोलिसांत तक्रार करेल, असे म्हणाला. या कारणावरून आरोपी वासरे याला राग आल्याने त्याने शिवीगाळ करीत दमदाटी केली. तसेच त्याच्याजवळील पिस्तुलाने ओवेज याच्या छातीच्या उजव्या बाजूवर गोळी झाडून त्याचा खून केला. वाकड पोलीस तपास करीत आहेत.